गोवा खबर

राज्यातील गावागावात मूलभूत सुविधा पुरविण्यात काँग्रेस बीजेपी सरकारला अपयश: आर.जी

Published

on

Spread the love
दिल्लीत गोवेकरासाठी त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवू:रूबर्ट पेरेरा
गोवा खबर:भारतात लोकसभा निवडणुकीचं बिगुल जरी काही दिवसापूर्वी वाजलं असलं तरी रेव्होलुशनरी गोवन्स पक्षाने काही महिन्यापूर्वीच गावागावात लोकांच्या गाठीभेटी, बैठका, आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. आता आर.जी. पक्षाचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, काल रविवारी वास्को येथील बाजारात त्यांनी सांत आंद्रे मतदार संघाचे आमदार विरेश बोरकर यांच्यासह आपला प्रचार केला. रेव्होलुशनरी गोवन्स ह्या उभरत्या आणि लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरलेल्या पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आर.जी. पक्षाचे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार रूबर्ट पेरेरा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रुबर्ट पेरेरा यांच्या बरोबर सांत आंद्रेतील आमदार विरेश बोरकर हे सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार बरोबरीने करीत असून,दक्षिण गोव्यातील मतदारसंघात त्यांचा घरोघरी प्रचार सुरूच असून, गावागावांतील ग्राउंड रिॲलिटीचा अनुभव ते घेत आहे. बीजेपी काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांनी इतकी वर्षे सत्ता उपभोगली, परंतु सामान्य जनतेचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काहीच केले नाही. अनेक गावांना रस्ते, पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. या प्रचारा दरम्यान राज्य सरकारच्या अंत्योदय तत्व, हर घर जल, प्रशासन तुमच्या दारी, स्वयंपूर्ण गोवा ह्यात किती खोटारडेपणा आहे, ते दिसून येते. काल रविवारी रुबर्ट पेरेरा व विरेश बोरकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह वास्को बाजारात प्रचार केला. यावेळी जनतेकडून भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसून आले.काँग्रेस बीजेपी पक्षावर जनता कंटाळलेली असून, आता त्याचा विश्वास फक्त रेव्होलुशनरी गोवन्स ह्या एकाच पक्षावर असल्याचे स्वतः लोकांकडून सांगण्यात येत असून, गोवेकर यावेळी बदल घडवून आणणार व आपले अस्तित्व राखण्यासाठी आर.जी. पक्षालाच एकमेव पर्याय म्हणून दोन्ही जागा निवडून आणणार असल्याचे विरेश बोरकर यांनी म्हटले.
दक्षिण गोव्यात लोकसभा प्रचारदरम्यान गावागावांतील भयानक वास्तविकता समोर आली असून, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची वणवण, रस्ता नसल्याने लोकांचे होणारे हाल, घरांची परिस्थिती ही अत्यंत दुर्दैवी असून, मोठमोठ्या कार्यक्रमातून राज्य सरकारकडून केली जाणारी विकासाची भाषणे ही फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठीच असतात. आजपर्यंत काँग्रेस बीजेपी पक्षाच्या खासदारांनी कधीच गोवेकरांचे ज्वलंत विषय दिल्ली संसदेत मांडले नाही. जनतेच्या समस्या, त्यांचे विषय केंद्र सरकारकडे मांडले नाही. परंतु आता आम्ही आर.जी. पक्ष जसा आमचा एकमेव आमदार स्वताच्या सांत आंद्रे मतदारसंघातील प्रश्नच नाही तर गोव्यातील कानाकोपऱ्यातील गोवेकरांचे ज्वलंत विषय मांडतात, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा दिल्ली संसदेत गोवेकरांचा आवाज बनून आमच्या अस्तित्वासाठी लढा देणार असल्याचे दक्षिण गोवा उमेदवार रूबर्ट पेरेरा यांनी यावेळी बोलताना म्हटले.

Trending

Exit mobile version