गोवा खबर

सर्व पक्ष फिरून आलेल्या नेत्याला उत्तर गोव्याची उमेदवारी म्हणजे काँग्रेसच्या डबघाईची सुरुवात:भाजपा

Published

on

Spread the love
 गोवा खबर:उमेदवार जाहीर करण्यासाठी 14-15 व्या टप्प्यापर्यंत वाट पाहावी लागणे ही काँग्रेसमध्ये नेतृत्वाची दिवाळखोरी दर्शवत आहे. गोव्यातील एका नावाजलेल्या सहकारी बँकेचे परिसमापन ज्या व्यक्तीच्या देखरेखीखाली झाले, त्याच व्यक्तीला उत्तर गोवा मतदारसंघाची तिकीट जाहीर करणे म्हणजे देशभराप्रमाणे उत्तर गोव्यातही काँग्रेस पक्षाला डबघाईस नेण्यासारखे आहे. काँग्रेसच्या उमेदवारावंर आज विरोधक नव्हे तर खुद्द काँग्रेस नेतेच टीका करत आहेत, असा टोला भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवार घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना हाणला.
गोव्यातील बहुतांश राजकीय पक्षांमध्ये फिरून आलेल्या आणि गेल्या काही निवडणुका हरलेल्या व्यक्तीला उत्तर गोव्याचे तिकिट देण्यात आले आहे. तर, दक्षिणेत भाजप उमेदवाराच्या विरोधात विधानसभा पराभूत झालेल्या व्यक्तीला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. यामुळे केंद्रात राहुल गांधींप्रमाणे गोव्यातही पराभूत नेत्यांना पुन्हा पुन्हा लाँच करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, असे वेर्णेकर म्हणाले.
भाजपने उत्तरेत एका मुरलेल्या अनुभवी भंडारी नेत्याला उमेदवारी दिली आहे तर आरक्षण नसतानाही दक्षिण गोव्यात एका महिलेला प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे. काँग्रेसने कोणत्या निकषावर उमेदवारी जाहीर केली, हे स्पष्ट करावे, असे आव्हान वेर्णेकर यांनी दिले.
भाजपने केवळ आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत तर त्यांनी आपल्या प्रचाराचा एक टप्पाही पूर्ण केलेला आहे. या उलट काँग्रेसचा प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण होईपर्यंत मतदानही पूर्ण होईल, असा टोला वेर्णेकर यांनी हाणला.
भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्यांनी कोणती बँकही बुडवलेली नाही. आपल्याला तिकीट मिळाले नाही तर आपण श्रीपाद नाईक यांना मत देणार असल्याचे खुद्द रमाकांत खलप यांनी सांगितले होते. त्यामुळे अशा व्यक्तीच्या मागे काँग्रेस कार्यकर्ते राहतील का, असा सवाल वेर्णेकर यांनी व्यक्त केला. भाजपने आपल्या विद्यमान खासदारांना सुरुवातीलाच तिकिट जाहीर केले. या उलट काँग्रेसने विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना तिकिट नाकारून ते अकार्यक्षम असल्याचे दाखवून दिले आहे, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
काँग्रेस सध्या दिवाळखोरीच्या दिशेने जात असल्याची खंत खुद्द काँग्रेस नेते विजय भिके यांनी व्यक्त केली आहे. तसेच, काँग्रेसचे सहकारी पक्ष काँग्रेसला त्या दिशेने नेत असल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे, असे वेर्णेकर म्हणाले.
भाजपचा प्रचार हा विरोधकांच्या उमेदवारांवर अवलंबून नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गेल्या 10 वर्षातील काम, भाजपच्या केडरचे काम आणि विकसित भारताच्या स्वप्नाच्या माध्यमातून असेल, असेही वेर्णेकर यांनी शेवटी स्पष्ट केले.

Trending

Exit mobile version