गोवा खबर

उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेसच्या तिकीटींच्या दरावर नियंत्रण आणा !

Published

on

Spread the love

‘सुराज्य अभियान’ची गोव्यातील वाहतूक खात्याकडे मागणी

गोवा खबर: उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेसच्या तिकीटींच्या दरावर नियंत्रण आणा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची एका शाखा असलेल्या ‘सुराज्य अभियान’ या संस्थेने गोव्याचे वाहतूक खात्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यासंबंधी निवेदन वाहतूक खात्याचे उपसंचालक (उत्तर विभाग) श्री. बी.ए.सावंत यांना २८ मार्च या दिवशी देण्यात आले. हे निवेदन देतांना ‘सुराज्य अभियान’च्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री सुशांत दळवी, मिहीर दळवी आणि दिलीप शेट्ये यांचा समावेश होता.


निवेदनात म्हटले आहे की, शाळांमध्ये उन्हाळ्याची सुट्टी पडल्यानंतर मागणी वाढल्याने प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेसच्या तिकीटाचे दर नियमित तिकीट दरापेक्षा दुप्पट किंवा त्याहून अधिक वाढवले जातात. यामुळे प्रवाशांना आर्थिक भ्रुदंड पडतो. महाराष्ट्र राज्यात प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेसच्या तिकीटींच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘जी.आर्.’ काढलेला आहे. यानुसार खासगी बसचालकांना राज्य शासनाच्या बसच्या तिकीट दरापेक्षा अधिकाधिक दीडपट दर आकारता येतो. अशाच प्रकारे गोवा सरकारनेही खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसेसच्या तिकीटींच्या दरावर नियंत्रण आणणारा आदेश तातडीने काढावा.

मेक काय ट्रिप’ आदी १८ बेकायदेशीर प्रवासी ॲप्स बंद करा ?
प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुमती न घेता बेकायदेशीर ‘ॲग्रीगेटर ॲप’चा व्यवसाय करणार्‍या ‘मेक माय ट्रिप’, ‘रेड बस’,‘गोआयबिबो’,‘सवारी’ असे एकूण १८ खासगी प्रवासी ॲप्स बंद करण्याची सूचना पुणे प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी ६ मार्च २०२४ या दिवशी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने गेली ४ वर्षे वारंवार पाठपुरावा करून प्रवाशांची लुट करणारे हे प्रवासी ॲप्स, तसेच ट्रॅव्हल्स आस्थापने यांच्यावर कारवाईसाठी आंदोलने आणि तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर ‘ॲप्स्’ बंद करण्याची सूचना करण्यात आली. बेकायदेशीर ॲग्रीगेटर ॲप्स्वर कारवाई करण्याची मागणी ‘सुराज्य अभियान’ करत आहेत. तसेच प्रवासी वाहतुकीसंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी वाहतूक खात्याने ‘हेल्प लाईन’ नंबर प्रसिद्ध करावा.

Trending

Exit mobile version