गोवा खबर

महिला दिनानिमित्त महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचा लाभ घेण्याचे गोवा टपाल विभागाचे आवाहन

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर:गोवा टपाल विभागाने, 8 मार्च 2024 रोजी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचा लाभ घेण्याचे आवाहन महिलांना केले आहे.  महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि बचत संस्कृतीला चालना देण्यासाठी, केन्द्र सरकारने महिला लाभार्थ्यांना समर्पित एक लघु बचत योजना, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023, आणली.

केवळ महिलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करणेच नव्हे तर मुलींचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा उद्देश असलेल्या या योजनेचा लाभ जवळच्या टपाल कार्यालयाच्या माध्यमातून घेता येऊ शकतो.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023 ही योजना महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने अनेक ठळक वैशिष्ट्ये आणि फायदे प्रदान करते. महिलांना स्वतःच्या नावे किंवा पालकांच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीच्या नावे खाते उघडण्याची लवचिकताही आहे.  गुंतवणुकीचा कालावधी 2 वर्षांचा असून, संपत्ती निर्माणासाठी हा एक समर्पित मार्ग सुनिश्चित करते.

खाते, उघडण्याच्या तारखेपासून 2 वर्षांनी परिपक्व होईल. ते आर्थिक नियोजनासाठी एक संरचित दृष्टीकोन प्रदान करेल. खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, दोन छायाचित्रे, मुलीचे जन्म प्रमाणपत्र (लागू असल्यास), पॅन कार्ड आणि पालकांच्या आधार कार्डच्या प्रती, ही आवश्यक कागदपत्रे आहेत.

दरसाल 7.5% इतका आकर्षक व्याजदर, त्रैमासिक आणि चक्रवाढ जमेसह, ही योजना आर्थिक वाढीसाठी एक आकर्षक संधी प्रदान करते. शिवाय, खाते उघडल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर शिल्लक रकमेच्या 40% पर्यंत रक्कम गुंतवणूकदार काढू शकतात, यामुळे आवश्यकतेनुसार काही प्रमाणात तरलता उपलब्ध होऊ शकते.

ही योजना वाजवी खात्याची मर्यादा देखील लागू करते, ज्यामुळे व्यक्तींना जास्तीत जास्त 2,00,000/- रुपयांच्या मर्यादेत कितीही खाती उघडता येतात. मात्र, गुंतवणुकीसाठी विवेकपूर्ण, संतुलित दृष्टीकोन सुनिश्चित केला आहे, परिणामी विद्यमान आणि नवीन उघडल्या जाणाऱ्या खात्यांदरम्यान 3 महिन्यांचे अंतर अनिवार्य आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, 2023, साठी गुंतवणूकदारांना कोणतीही वयोमर्यादा नाही. यात सर्वसमावेशकतेवर भर दिला असून किमान 1000/- रुपयांच्या ठेवीसह गुंतवणुकीत लवचिकता प्रदान केली आहे.

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या या उपक्रमाचा उद्देश भारतातील महिलांमध्ये आर्थिक विवेकाची सवय वाढवणे हा आहे. 1 एप्रिल 2023 पासून कार्यरत असलेली ही योजना 31 मार्च 2025 रोजी पूर्ण होणार आहे.

 

Trending

Exit mobile version