गोवा खबर

भाजपचे गोव्याबाहेरील कलाकारांवरचे प्रेम पुन्हा एकदा उघड : मिशेल रिबेलो

Published

on

Spread the love
रवींद्र भवन, मडगाव येथे संगीत, नृत्य व नाट्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यासाठी काँग्रेसकडून ३१ मार्चचा अल्टिमेटम
गोवा खबर: रवींद्र भवन, मडगावने महिला दिनानिमित्त आयोजित संगीत मैफलीसाठी 4 पैकी 3 गायकांना महाराष्ट्रातून आमंत्रित करणे  धक्कादायक आहे. आम्ही या निर्णयाचा तीव्र निषेध करतो असे सांगून महिला दिन कार्यक्रमात गोव्यातील कलाकारांना कला सादरीकरणाची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते आणि जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी केली आहे.
महिला दिन कार्यक्रमाबद्दल रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी केलेल्या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, काँग्रेस नेत्या मिशेल रिबेलो यांनी गोमंतकीय कलाकारांकडून कमिशन मिळत नसल्यानेच त्यांना सादरीकरणाची संधी दिली जात नाही असा आरोप केला आहे.
महिला दिनाच्या कार्यक्रमात साधना सरगम, वैशाली सामंत आणि आनंदी जोशी यांचे सादरीकरण असेल. हे सर्व गायक महाराष्ट्रातील आहेत. गोव्याची नाइटिंगेल लोर्ना किंवा हेमा सरदेसाई यांना का आमंत्रित केले नाही? गोव्यातील इतर प्रतिभावान गायकांना संधी का दिली नाही? असा सरळ सवाल मिशेल रिबेलो यांनी विचारला आहे.
रवींद्र भवन, मडगाव हे संपूर्ण सासष्टी तालुक्यासाठी आहे. मडगाव नगरपालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मतदारसंघातील तीन आमदारांनी  शिफारस केलेल्या तियात्रांनाच   राजेंद्र तालक सभागृह कसे देवू शकतात? सासष्टीच्या सर्व आमदारांच्या शिफारसी त्यांनी घेणे बंधनकारक आहे असा दावा मिशेल रिबेलो यांनी केला आहे.
रवींद्र भवन, मडगाव हे भाजप कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन केंद्र बनले आहे. कार्यकारिणीवर नियुक्त झालेल्या सदस्यांना कला आणि संस्कृतीचा गंध नाही. कला आणि संस्कृतीकडे संबंधीत प्रत्येक सदस्याची  माहिती सरकारने उघड करावी, अशी मागणी मिशेल रिबेलो यांनी केली आहे.
रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक हे  संगीत आणि नृत्याचे वर्ग घेणाऱ्या एका खाजगी संस्थेशी संबंधित आहेत. आपले हितसंबंध तेथे गुंतल्यानेच रवींद्र भवनात संगीत, नृत्य आणि नाट्य प्रशिक्षण  वर्ग सुरू करण्याची त्यांची तयारी  नाही, असे मिशेल रिबेलो यांनी उघड केले.
सरकारने मडगावच्या रवींद्र भवनात एप्रिलपासून मुले आणि तरुणांसाठी संगीत, नृत्य आणि नाट्य प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत, अशी आमची मागणी आहे, असे न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा मिशेल रिबेलो यांनी दिला आहे.

Trending

Exit mobile version