गोवा खबर

विद्यार्थी संसद पारितोषिक वितरण

Published

on

Spread the love

गोवा खबर:पर्वरी येथील गोवा विधिमंडळ सचिवालय यांनी गोवा विधीमंडळ मंचाच्या समन्वयाने आयोजित केलेल्या विद्यार्थी संसद, २०२४ चा पारितोषिक वितरण समारंभ आज पार पडला. स्वयंशिस्त, अभिव्यक्तीचा अधिकार, इतरांच्या मतांबद्दल सहिष्णुता, सुधारित वादविवाद आणि लोकशाही जीवनातील विविध गुणांना सामोरे जाणे हे गुण विद्यार्थ्यी समाजामध्ये बिंबवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

या कार्यक्रमाला गोवा विधानसभेचे सभापती श्री रमेश तवडकर, विधिमंडळ मंत्री श्री आलेक्स सिक्वेरा आणि इतर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सभापती श्री.तवडकर यांनी तरुणांनी चांगले नेते, शोधक आणि नवोन्मेषक होण्यासाठी त्यांना पाठबळ मिळणे आणि भविष्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांना चांगले प्रशिक्षण, शिक्षण देणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. जे व्हायचे आहे ते स्वप्न पाहा, ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करून स्वप्नांचा अवलंब करा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विधीमंडळ मंत्री श्री आलेक्स सिक्वेरा यांनी अशाप्रकारच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे असे सांगितले. तरुणांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे कारण ते भविष्याचा आवाज आहेत असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, तरुणांचा उत्साह आणि उर्जा याआधीच काही देशांमध्ये अव्वल असलेल्या भारताला आणखी प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम देश बनविण्यात मदत करील. तरुणांची दूरदृष्टी या देशातील लोकशाहीइतकीच ताकदवान आहे आणि तरुण लोक लोकशाहीला अधिक बळकट करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताने याआधीच जगात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे आणि आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने मोठी वाटचाल करीत आहे आणि आपले लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे भारताला सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात देशातील तरुणांचा मोठा वाटा असेल.

मंत्र्यांनी गोवा विधानमंडळ सचिवालयाचे कौतुक केले आणि गोवा विधिमंडळाच्या मंचाच्या समन्वयाने विद्यार्थी संसद स्पर्धा आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले.

विद्यार्थी संसद स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्ञानप्रसारक मंडळ कॉलेज, आसगाव, द्वितीय क्रमांक विद्या विकास मंडळ, गोविंद रामनाथ कॉलेज ऑफ लॉ, कोंब मडगांव यांनी तर तृतीय क्रमांक फोंडा एज्युकेशन सोसायटीचे रवी एस. नाईक कला आणि विज्ञान महाविद्यालयाने पटकावला.

स्पर्धेचे परीक्षक, मंचाचे उपाध्यक्ष श्री व्हिक्टर गोन्साल्विस, सचिव मंच ॲड. सदानंद मलिक आणि मंचाचे सदस्य श्री जॉन फर्नांडिस हे होते.

विधीमंडळ मंचाचे उपाध्यक्ष श्री व्हिक्टर गोन्साल्विस, विधिमंडळ मंच सचिव श्री मोहन आमशेकर, सचिव (विधिमंडळ) श्रीमती. नम्रता उलमन, माजी खासदार राज्यसभा श्री जॉन फर्नांडिस, खजिनदार मंच, श्री सदानंद मळिक, माजी उपसभापती श्री शंभू भाऊ बांदेकर, माजी मंत्री श्री महादेव नाईक आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

विधिमंडळ मंचाचे सचिव श्री मोहन आमशेकर यांनी स्वागत व नंतर आभार मानले. सूत्रसंचालन माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्विस यांनी केले.

Trending

Exit mobile version