गोवा खबर: गोव्याचे प्रमुख आकर्षण असलेला जगप्रसिद्ध गोवा कार्निवल 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान गोव्यातील पाच शहरांमध्ये रंगणार आहे. परंपरा, संगीत, नृत्य आणि पाककला यांचं मनमोहक मिश्रण असलेला हा उत्सव गोव्याची ओळख आहे.
9 तारखेला पर्वरीमध्ये कार्निवलला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पणजी, मडगाव, वास्को आणि 13 फेब्रुवारीला म्हापुसा येथे उत्सवाचा समारोप होणार आहे. कार्निवलचे मुख्य आकर्षण म्हणजे फ्लोट परेड. अद्भुत सजावट केलेले फ्लोट्स, रंगीबेरंगी पोशाख आणि उत्साही नर्तक यांचा एक मंत्रमुग्ध करणारा असा हा देखावा असतो. गोवा पर्यटन विभाग या परेडचे आयोजन पणजी, मडगाव, म्हापुसा, वास्को आणि पर्वरी येथे करते. यामध्ये पारंपारिक संगीत आणि नृत्य सादरीकरणाद्वारे गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या विविध थीमचे चित्रण केले जाते.
#ADVT विकसित भारत;विकसित गोवा 2047!
कार्निवलचा राजा किंग मोमो कार्निवल मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना प्रेरित करतो. “खा, प्या आणि मौज करा! हा संदेश देत तो कार्यक्रमाची सुरुवात करतो”. कार्निवल मध्ये वेशभूषा स्पर्धांचाही समावेश होतो, ज्यामुळे अभ्यागतांना त्यांची सर्जनशीलता दाखवता येते आणि आकर्षक बक्षिसे जिंकता येतात. गोव्याचे रस्ते स्थानिक आणि पर्यटकांनी फुलून जातात. नाचत गात हा उत्सव ते जीवंत करतात.
वर्षानुवर्षे गोवा कार्निवल विकसित झाला आहे. हा उत्सव गोव्याच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग बनला आहे. तेथील उत्साही वातावरण, समृद्ध इतिहास आणि सीमा ओलांडणाऱ्या एकतेच्या आनंदी भावनेने मोहित झालेल्या पर्यटकांना आकर्षित करते.
9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान गोव्यातील मोहक कार्निवल मध्ये सहभागी व्हा. एक अविस्मरणीय अनुभव घ्या.