गोवा खबर

यूजीसीच्या पदांना ‘अनआरक्षित’ करण्याच्या प्रयत्नाबद्दल युवक काँग्रेस, एनएसयूआयने भाजप सरकारचा केला निषेध

Published

on

Spread the love
गोवा खबर: अनुसूचित जाती, जमाती व  इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव जागेवर उमेदवार उपलब्ध नसल्यास जागा अनआरक्षित जाहीर करता येणार असल्याचा नवीन मसुदा विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) काढल्याने युवा कॉंग्रेस व एनएसयुआयने भाजप सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. हे सरकार बहुजन विरोधी असून त्याला घरी पाठवण्याचे आवाहन युवकांना केले आहे.
गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्राद्र  यांनी बुधवारी काँग्रेस कार्यालयात  पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावर भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष नौशाद चौधरी, युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अहराज मुल्ला, नितीन पाटकर आदी उपस्थित होते.
आंद्राद्र म्हणाले की, मंगळवारी संध्याकाळी युजीसीने अनुसूचित जाती, जमाती व  इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव जागा अनआरक्षित करण्यासाठी प्रकाशीत केलेली मार्गदर्शक तत्त्वे विरोध झाल्यावर आपल्या वेबसाइटवरून मागे घेतली.
“जर ती लागू झाली तर बहुजन समाजातील तरुण आरक्षणापासून वंचित राहतील. आरक्षण हटवण्याचे डावपेच खेळणाऱ्या भाजप सरकारचा आम्ही निषेध करतो,” असे ते म्हणाले.
अहराज मुल्ला म्हणाले की, राहुल गांधींनी बहुजन समाजाशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रा आणि न्याय यात्रा काढली. “आम्ही उपेक्षित समाजाला जोडण्याचा प्रयत्न करत आहोत, पण दुसरीकडे युजीसी बहुजन समाजाला त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे,” असे मुल्ला म्हणाले.
भाजपची विचारधारा ही बहुजनविरोधी आहे असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, संविधान समानता सुचवते आणि लोकांचे हक्क हिरावून घेत नाही. “हा मसुदा प्रत्यक्षात आल्यास बहुजन समाजातील तरुणांवर अन्याय होईल,’ असे नौशाद चौधरी म्हणाले.
” हा बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांवर हल्ला आहे. संविधानाने बहुजन समाजाला दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
नौशाद चौधरी म्हणाले की, मसुदा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे सुचवण्यात आले आहे की जर एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील पुरेसे उमेदवार उपलब्ध नसतील, तर ही पदे सर्वसाधारण श्रेणीत भरली जातील.
 नितीन पाटकर म्हणाले की, भाजप सरकारला बहुजन समाजाची ॲलर्जी आहे, त्यामुळे त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. “बहुजन समाजातील तरुणांना पदे मिळण्यापासून वंचित ठेवण्याची भाजप सरकारची ही योजना आहे. त्यांना आरक्षण हटवायचे आहे आणि या समाजाच्या उत्पन्नाचे स्रोत नष्ट करायचे आहेत, जे आम्ही खाण व्यवसाय बंद झाल्यावर  पाहिले आहे,” असे पाटकर म्हणाले.
बहुजन समाजातील तरुणांनी सतर्क राहून भाजप सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले.

Trending

Exit mobile version