गोवा खबर: केंद्र सरकारच्या यंत्रणांनी बेरोजगारीवरून गोवा सरकारचा पर्दाफाश केला असला तरी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मान्य करायला तयार नाहीत आणि निवडणुकीच्या वेळी मतदारांची मते मिळविण्यासाठी राज्यातील जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेसने शुक्रवारी केला.
गोव्याचे एआयसीसी मीडिया प्रभारी हर्षद शर्मा यांनी शुक्रवारी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि युवकांना रोजगार देण्याबाबत वारंवार खोटी आश्वासने दिल्याबद्दल भाजप सरकारवर टीका केली.
गोवा प्रदेश काँग्रस समितीचे सरचिटणीस विजय भिके, उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर आणि उत्तर गोवा सरचिटणीस प्रणव परब हेही उपस्थित होते.
हर्षद शर्मा पुढे म्हणाले की, राज्यात बेरोगजारी असुनही मुख्यमंत्री प्रमोद सावंत मान्य करायला तयार नाहीत.
“हे स्वीकाराले नाही तर या समस्येवर तोडगा कसा काढणार? बेरोजगारीमुळे तरुण त्रस्त आहेत, मात्र हे असंवेदनशील सरकार रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे,” असे शर्मा म्हणाले.
गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ताशेरे ओढत काँग्रेस नेते शर्मा म्हणाले की ते नेहमीच घटनांचा कालक्रम विचारतात.
“म्हणून, मी त्यांना गोवा बेरोजगारीखाली कसे त्रस्त आहे याचा एक क्रम देऊ इच्छितो. नोव्हेंबर 2022 मध्ये, निती आयोगाने सांगितले की गोव्याचा बेरोजगारीचा दर 10.5 टक्के आहे, जो देशातील तिसरा सर्वोच्च आहे. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये सावंत म्हणाले की, राज्यात बेरोजगारी नाही. ते नीती आयोगाचा अहवाल देखील स्वीकारत नाहीत,” असे शर्मा म्हणाले आणि 1.10 लाख तरुण बेरोजगार असल्याची माहिती त्यांनी दिली.
“त्याच महिन्यात सीएमआयईने सांगितले की गोव्याचा बेरोजगारीचा दर १३.७ टक्के होता, जेव्हा राष्ट्रीय सरासरी दर ७ टक्के होती. त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये, सांख्यिकी मंत्रालयाने उघड केले की बेरोजगारीत गोवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातून सावंत यांचा खोटारडेपणा उघड झाला. त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये, आरबअियने एक निवेदन जारी केले की ग्रामीण बेरोजगारीमध्ये गोवा अव्वल स्थानावर आहे. हे अहवाल काँग्रेसने बनवलेले नाहीत, ते केंद्र सरकारच्या एजन्सीने बनवले आहेत. ते खोटे बोलत आहेत का, सावंत यांनीही यावर स्पष्टीकरण द्यावे आणि केंद्र सरकार खोटे बोलत आहे का ते सांगावे,” असे शर्मा म्हणाले.
शर्मा म्हणाले की, भाजपमध्ये भ्रष्टाचार इतका आहे की, पक्षाचे नेते त्यांच्या मंत्र्यांवर आरोप करत आहेत.
विजय भिके म्हणाले की, अत्यंत कमी सरकारी नोकऱ्यांसाठी हजारो उमेदवार अर्ज करतात, यावरून युवक बेरोजगार असल्याचे सिद्ध होते. “
‘‘परीक्षा देणाऱ्यांना हे सरकार नोकऱ्या देईल याची शाश्वती नाही. हे सरकार ‘सूटकेस’ घेण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि यापूर्वी ‘नोकरी घोटाळा’ उघड झाला होता,” असे भिके म्हणाले.
परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना नोकऱ्या देण्यात भाजप अपयशी ठरल्यास काँग्रेस पक्ष हा मुद्दा उपस्थित करेल, असे भिके म्हणाले. “निवडणुकीत नेहमी नोकऱ्यांची आश्वासने देणाऱ्या आणि नंतर शीतगृहात टाकणाऱ्या भाजपच्या डावपेचांना बळी पडू नका,’’ असे आवाहन त्यांनी केले.