गोवा खबर: “ओपिनियन पोल, घटकराज्याचा दर्जा आणि कोकणीला राजमान्यता यासह गोव्याची ओळख टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे योगदान जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी इतिहासाची पुस्तके वाचावीत.
डॉ. प्रमोद सावंत, अर्धवट ज्ञान धोक्याचे अशा शब्दात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
पूर्वीच्या सरकारांनी गोव्याला महाराष्ट्राच्या जिल्ह्याप्रमाणे वागणूक दिली आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गोव्याला खरी ओळख दिली, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
भाजप सरकारांनी गोव्याला कॅसिनो कॅपिटल ऑफ इंडिया, क्राइम डेस्टिनेशन, ड्रग डेस्टिनेशन, कोल हब अशी ओळख दिली आणि गोव्याचे पर्यावरण, जंगल आणि वन्यजीव नष्ट करण्याची एकही संधी सोडली नाही, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.