गोवा खबर:जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, गोवा – २०२४ साठी प्रसाद जोशी, राधेश वर्टी आणि विशांत नागवेकर यांची पर्पल अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. कर्णबधीर दिव्यांगत्व, हिमोफिलिया दिव्यांगत्व आणि अस्थि दिव्यांगत्व याचे प्रतिनिधित्व (अनुक्रमे) प्रसाद जोशी, राधेश वर्टी आणि विशांत नागवेकर करणार आहेत.
‘गोवा असोसिएशन ऑफ द डेफ’ चे संस्थापक आणि सरचिटणीस प्रसाद जोशी म्हणाले, “इंटरनॅशनल पर्पल फेस्ट-२०२४ साठी अॅम्बेसेडर म्हणून निवड होणे हा आपला सन्मान आहे. आपल्या समाजाचे प्रतिनिधित्व करणे ही खूप उत्साहवर्धक पण तेवढीच जबाबदारी वाढवणारी गोष्ट आहे. मी कर्णबधिरांचे प्रतिनिधित्व करत असून त्यांच्या समस्या आण चिंता योग्य अधिकारिणीसमोर उपस्थित करणे हे माझे काम असेल. त्याचबरोबर कर्णबधिरांनी मिळवलेले यश आणि क्षमता जगासमोर मांडायच्या आहेत”.
जोशी हे ‘ऑल इंडिया डेफ आर्ट्स अँड कल्चर सोसायटी’चे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. ते शाळांमध्ये भारतीय सांकेतिक भाषेचा समावेश करण्यासाठी जनजागृती करत आहेत. याशिवाय त्यांना गोवा सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून ‘दिव्यांग श्रेणीतील सर्वोत्कृष्ट सरकारी कर्मचारी’ हा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. पर्पल फेस्टच्या माध्यमातून ‘भारतीय सांकेतिक भाषा’ ही भारताची २३वी अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जन्मापासून हिमोफिलिया हा रक्तविकार असलेले राधेश वर्टी यांनी नेरुलमध्ये ‘पद्मा प्रिंटर्स’ची स्थापना केली. हिमोफिलिया दिव्यांगजनांच्या सबलीकरणासाठी काम करणाऱ्या पणजीतील हिमोफिलिया सोसायटीच्या उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे समर्थन देतात. दिव्यांगजनांचे उत्थान करणे, दिव्यांगजनांना उपजीविका मिळवून देण्यासाठी मदत करणे आणि समान संधी असलेल्या समाजाची निर्मिती करणे हे माझे ध्येय आहे,” अशी प्रतिक्रिया वर्टी यांनी व्यक्त केली.
गोव्यातील दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत, असा विश्वास वर्टी यांनी व्यक्त केला. आपण सक्षम आहोत हा विश्वास दिव्यांगजनांना मिळणे आणि स्वतःच्या योग्यतेची जाणीव होणे गरजेचे असल्याचे ते म्हणतात.
८९% अस्थि दिव्यांगत्व असलेले विशांत नागवेकर हे गोवा सरकारच्या वन विभागामध्ये काम करतात. तसेच गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या सल्लागार समितीचे ते सक्रिय सदस्य आहेत. अनेक वर्षांपासून दिव्यांगांच्या विविध समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी मोठे योगदान देणारे नागवेकर म्हणाले: “पर्पल फेस्टचा अॅम्बेसेडर म्हणून निवड झाल्याचा मला अभिमान आहे. हा सन्मान मला दिव्यांगजनांच्या भल्यासाठी आणखी कठोर परिश्रम करण्यास प्रेरित करेल.”
गेल्या वर्षी झालेल्या पहिल्या महोत्सवामध्ये अखिल भारतीय पर्पल पॅरा-टेबलटेनिस स्पर्धेच्या आयोजन समितीमध्ये त्यांचा सहभाग राहिला होता. या स्पर्धेत भारतातून ११७ दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यंदाही आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, गोवा– २०२४मध्ये अशा प्रकारचा स्पर्धात्मक उपक्रम आयोजित करण्याची त्यांची योजना आहे. खेळाच्या माध्यमातून दिव्यांगजनांना एकत्र आणता येते, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारता येते असा विश्वास नागवेकर व्यक्त करतात.
भारतीय दिव्यांगजन अधिकार कायदा,२०१६नुसार दिव्यंगत्वाचे २१ प्रकार सूचिबद्ध करण्यात आले आहेत. या प्रत्येक दिव्यांगत्वासाठी तसेच मणक्याची दुखापत दिव्यांगत्व या विशेष समावेशासह एकूण २२ दिव्यंगत्वाचे प्रतिनिधित्व हे २२ पर्पल अॅम्बेसेडर करणार आहेत. अभिमानाची बाब म्हणजे यापैकी तीन पर्पल अॅम्बेसेडर हे गोमंतकीय आहेत.