गोवा खबर:तियात्र अकादमीच्या परिषदगृहात नुकताच मीट द टियाटर आर्टिस्ट हा कार्यक्रम पार पडला. सुप्रसिद्ध तियात्रिस्ट श्री पास्कोल फ्रान्सिस्को अॅनिसेटो लॉरेन्सो आणि सोनिया शिरसाट पाहुणे कलाकार होते. कार्यक्रमाचे मुलाखतकार श्री सुकुर फर्नांडिस, तियात्र अकादमीचे अध्यक्ष श्री सगुण आर वेळीप आणि तियात्र अकादमीचे सदस्य सचिव श्री सुरेश दिवकर व्यासपीठावर उपस्थित होते.
तियात्र अकादमीचे अध्यक्ष श्री सगुण आर वेळीप यांनी कलाकारांचे स्वागत करताना ही मुलाखत डॉक्युमेंटेशनच्या स्वरूपात जपून ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. जेणेकरून तियात्र क्षेत्रात येणाऱ्या कलाकारांना चालना मिळेल असे ते म्हणाले. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते माहितीपुस्तिकेचे उद्घाटन करण्यात आले. मुलाखत व्हिडिओ स्वरूपात यूट्यूबवर अपलोड केली जाईल.
याप्रसंगी पाहुण्या कलाकारांना आणि मुलाखतकार तसेच कलाकारांना स्मृतीचिन्हांसह सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सोनिया शिरसाट यांची मुलाखत प्रथम आणि त्यानंतर पास्कोल फ्रान्सिस्को अॅनिसेटो लॉरेन्सो यांची मुलाखत घेण्यात आली. आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन श्री काशिनाथ भोंसले यांनी केले.