गोवा खबर

जमीन रूपांतरणाद्वारे 50 हजार कोटी रुपयांची लूट करण्याचे विश्वजित राणेचे लक्ष्य, प्रादेशिक आराखडा प्रभावी ठेवण्यासाठी तीन दुरुस्त्या मागे घ्या: गिरीश चोडणाकर

Published

on

Spread the love
गोवा खबर: नगर आणि  नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी गेल्या सहा महिन्यांत दोन लाख चौरस मीटर जमिनीचे रुपांतर केल्याचा आरोप करत, काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेवून भाजप नेते टीसीपी कलम 17 (डी), 17 (2) आणि फार्महाऊस धोरण वापरून ५० हजार कोटी रुपये कमावण्याचे लक्ष्य ठेवत असल्याचे  सांगितले. 
“गोवा विकून पैसे मिळवण्याच्या राणे यांच्या लोभाची कल्पना करा. आपल्या कर्तव्याची जाणीव असलेला कोणताही जबाबदार व्यक्ती राज्याचा विध्वंस होऊ देणार नाही. जमीन खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पाठिंब्यानेच ते हे करत आहेत” असे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

#ADVT 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या 5 नोव्हेंबर 2023 चे वेळापत्रक

सरचिटणीस प्रदिप नाईक, मीडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, मांद्रे गटाचे अध्यक्ष नारायण रेडकर उपस्थित होते.
ते म्हणाले की भ्रष्ट भाजप सरकार 17 (डी) (झोन बदलणे), 17 (2) (प्रादेशिक आराखड्यातील त्रुटी सुधारुन रुपांतरण करणे) आणि गोवा रेग्युलेशन ऑफ लँड डेव्हलपमेंट अँड बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कायद्याचा वापर करून प्रादेशिक आराखड्याचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्याला लँड शार्कपासून वाचवण्यासाठी या तीन  दुरुस्त्या तात्काळ मागे घ्याव्यात, अशी आमची मागणी आहे, जर सरकार तसे करण्यात अपयशी ठरले तर त्यांना राज्य लुटायचे आहे आणि ते गोव्याच्या हिताच्या विरोधात काम करत असल्याचे स्पष्ट होईल. सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास येत्या पाच ते दहा वर्षांत गोवा संपेल,” असे चोडणकर म्हणाले.
ते म्हणाले, “आम्ही आमच्या जमिनीशी भावनिकरित्या जोडलेले आहोत, जी आता फारच मर्यादित राहिली आहे कारण सत्तेत असलेल्या राजकारण्यांनी जमीन विकली आहे. अनेक राजकारणी त्यात गुंतलेले आहेत,” असे  ते म्हणाले.
“भाजप सरकारने प्रादेशिक आराखड्याची  संकल्पनाच उद्ध्वस्त केली आहे. याआधी काँग्रेसच्या काळात गोवा बचाव अभियानाने  आमच्या जमिनी वाचवण्यासाठी आंदोलने केली. कारण आमचे आमच्या भूमीवर प्रेम आहे. मात्र, विश्वजित राणे यांच्याकडे जमीन रूपांतरणाचे कौशल्य आहे आणि गोवा संपवण्यासाठी ते लोकांच्या विरोधात काम करत आहेत” असे चोडणकर म्हणाले.
“गेल्या सहा महिन्यांपासून कलम 17 (2) वापरून 2 लाख चौरस मीटर जमिनीचे रूपांतर करण्यात आले आहे. हे सूटकेस ते सूटकेस आधारावर केले जाते. विश्वजीत राणे तीन सुधारित कलमांचा वापर करून जमीन लुटत आहेत. मात्र गोव्यातील जनतेने सतर्क राहावे. पेडणे येथील लोकांनी झोनिंग आराखडा रद्द करण्यासाठी आंदोलन केले, तसे इतरांनाही करावे लागेल” असे ते  म्हणाले.
“आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की राणे म्हणाले होते की, प्रादेशिक आराखड्यात सहा कोटी चौरस मीटर जमीन चुकीच्या पद्धतीने  भातशेती, फळबागा, इको सेन्सिटिव्ह झोन किंवा ग्रीन झोन म्हणून सूचीबद्ध झाली आहे. याचा अर्थ ते लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत की या भागात दुरुस्त कराव्या लागतील, ज्यामुळे लोक आंदोलन करणार नाही,” असे चोडणकर यांनी निदर्शनास आणून दिले.
केवळ पेडणे झोनिंग आराखड्यातून ५ हजार कोटी रुपये कमावण्याचा राणेंचा डोळा असल्याचा आरोप त्यांनी केला. “लोकांनी आंदोलन केल्यामुळेच त्यांनी ते रद्द केले आहे आणि त्याचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल याची भीतीही त्यांना होती. निवडणूकी नंतर राणे पेडणे येथील जमीन विकण्याचा अन्य कट रचू शकतो,” असे ते  म्हणाले.
सत्तरी तालुका, डिचोली तालुका, रेस  मागूस, उसगाव, कदंब पठार, आसगाव, नेरूल,  मोइरा, कामुरली, कोलवाळे, अंजुना, शिवोली आणि कोलवाळे येथील क्षेत्रीय आराखडा तयार करण्याचा निर्णय घेणार्‍या टीसीओएए मंडळ्याच्या बैठकीचे इतिवृत्तही त्यांनी वाचून दाखवले.
ते म्हणाले की, सुधारणांचा वापर करून कोट्यवधी रुपये खर्चून सर्व सुविधांसह फार्महाऊस बांधले जात आहेत. “आमच्या शेतकऱ्यांची फार्महाऊसवर करोडो रुपये खर्च करण्याची क्षमता आहे का? आणि शेती करण्यासाठी मोठ्या फार्महाऊसची गरज का आहे, ही जमीन रूपांतरित करुन पैसे लुटण्याची युक्ती आहे,” असे ते म्हणाले आनी अशा अनेक फार्महाऊसच्या पुराव्यांचा मंजूर आराखडा त्यांनी दाखवला.

Trending

Exit mobile version