गोवा खबर:वीज मंत्री श्री सुदिन ढवळीकर यांनी ३३ केव्ही, ३सीX४०० चौरस मीटरच्या दुहेरी सर्किट भूमिगत केबलचा पुरवठा, उभारणी, चाचणी आणि उपकेंद्र कार्यान्वित करण्याच्या कामाची मडगाव येथील बीपीएस स्पोर्ट्स क्लब येथे पायाभरणी केली. या प्रकल्पासाठी अंदाजे ४०,५०,५१,९४७ असा अंदाजे खर्च येणार आहे.
यावेळी बोलताना श्री.सुदिन ढवळीकर यांनी जुने दिवस आपण कधीही विसरता कामा नये. आम्ही पुढे आणलेले प्रकल्प जबाबदारीने पूर्ण केले पाहिजेत आणि ते लोकांच्या वापरासाठी सुरू केले पाहिजेत असे सांगितले. विद्युत खाते कोणताही भेदभाव न करता संपूर्ण गोव्यात एकाच वेळी पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करीत आहे. मडगावच्या पॉवर हाऊसचा चेहरामोहराही बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विकासकामांसाठी त्यांनी प्रत्येक नागरिकाना सहकार्य करण्याचे सांगितले. वेर्णा येथील अत्याधुनिक उपकेंद्रासाठी २५० कोटी रुपयांचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार श्री आलेक्सो रेजिनाल्डो यांनी वीज पायाभूत सुविधांचे काम पुढे नेल्याबद्दल त्यांनी सरकारचे कौतुक केले. चांगल्या कामाचे कौतुक करावे आणि केवळ टीकाच करू नये. वस्तुस्थिती समजून घेऊन राज्य आणि राष्ट्राच्या विकासासाठी एकत्र काम केले पाहिजे अले ते म्हणाले.
आमदार विजय सरदेसाई यांनी हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दशकाहून अधिक जुनी वीज गळतीची समस्या दूर होईल असे सांगितले. पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी खूप पैसा आवश्यक आहे आणि ते सोपे नाही. अपारंपरिक उर्जेच्या स्त्रोतांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गोवा हे प्रगतीशील राज्य असून सर्व लोकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळायला हव्यात असे ते पुढे म्हणाले.
अधिक्षक अभियंता श्री राजीव सामंत यांनी स्वागतपर भाषणात वीज प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाची असून ती अखंडित असावी यासाठी खाते प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यकारी अभियंता श्री डायगो कुतिन्हो उपस्थित होते.