गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या एलपीजी सिलिंडर रिफिलिंग योजना २०२३ साठी मुख्यमंत्री आर्थिक सहाय्याचा शुभारंभ केला. नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केल्यानुसार या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडर रिफिलवर मासिक रूपये २७५ चे अनुदान मिळेल. याशिवाय सर्व प्राप्तधारकांना अनुदानित दराने साखर उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी जाहीर केले. सरकारचे “अंत्योदय” तत्वाप्रती असलेले समर्पण अत्यावश्यक योजना आणि सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचविण्याची आपली बांधिलकी त्यांनी अधोरेखित केली.
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक यांनी अशा उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरणाला गती देण्यावर सरकारचा भर आहे असे सांगून एलपीजी सिलेंडर रिफिलिंग योजना २०२३ साठी मुख्यमंत्री आर्थिक सहाय्य गोव्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विविध तालुक्यातील ६० लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे प्रदान करण्यात आली.
नागरी पुरवठा मंत्री श्री रवी नाईक, नागरी पुरवठा सचिव श्री संजित रॉड्रिग्स, आयएएस, नागरी पुरवठा संचालक श्री गोपाळ पार्सेकर आणि उत्तर आणि दक्षिण गोव्यातील लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रदीप नाईक यांनी तर आभार नागरी पुरवठा संचालक गोपाळ पार्सेकर यांनी मानले.