गोवा खबर

आदिवासी समाज्याच्या भल्यासाठी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्याकडून राज्य सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा

Published

on

Spread the love

गोवा खबर:भारताच्या राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांनी राज्यातील आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. गोव्याचे राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राजभवन गोवा येथे गोव्यातील आदिवासी समाजातील सदस्यांशी संवाद साधल्यानंतर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की गोवा हे देशातील एकमेव असे राज्य आहे जेथे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आदिवासी खाते आहे. गोव्यातील आदिवासी समाज जीवनमान सुधारण्यात आणि त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात कधीही मागे राहणार नाही  असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला.

आदिवासी समाजाने स्वत:ला हीन समजू नये. आदिवासी समाज हा आपला वन, पाणी आणि जमीन यांचे संरक्षक आणि जीवनदाता आहेत. विविध राज्यातील आदिवासींशी संवाद साधतानाचा अनुभव सांगताना राष्ट्रपतींनी सांगितले की गोव्यातील आदिवासी इतर राज्यांच्या तुलनेत दोन पावले पुढे आहेत हे पाहून मला आनंद होत आहे. ते सुशिक्षित आणि व्यावसायिक डॉक्टर्स, वकील आहेत आणि व्यावसायिक कामातही गुंतलेले दिसतात असे त्या म्हणाल्या.

आदिवासी इतर समाजापेक्षा खूप वेगळे आहेत कारण ते एकत्र राहण्यावर विश्वास ठेवतात. हे मूल्य आपण या समाजातून रुजविले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. राष्ट्रपतींनी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात येऊन देशाच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी योगदान देण्याचा सल्ला दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या स्वागतपर भाषणात आदिवासी समाजाच्या भल्यासाठी राज्य सरकार सातत्याने काम करीत असून आदिवासी कल्याण खात्याकडून सुमारे १७ योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत असे सांगितले. वन हक्क अधिनियम, २००६ अंतर्गत अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक फोरेस्ट व्डेलर्स लाभार्थ्यांना १२२१ हून अधिक सनद देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा पुतळा गोव्यातील आदिवासी संशोधन संस्थेत लवकरच बसविण्यात येईल असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी आदिवासी समाजाला दिले.

मुख्यमंत्र्यांनी भारताच्या राष्ट्रपतींना रांगोळी कलाकार श्री आकाश नाईक यांनी तयार केलेले त्यांचे पोर्ट्रेट सादर केले.

यावेळी गोवा विधानसभेचे सभापती श्री. रमेश तवडकर, समाजकल्याण मंत्री श्री. सुभाष फळदेसाई,  माजी उपमुख्यमंत्री श्री.चंद्रकांत कवळेकर आणि आदिवासी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version