गोवा खबर

गोव्यातील मच्छिमार बांधवांना दिल्ली येथे स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष आमंत्रण

Published

on

Spread the love


आतापर्यंत दूरदर्शनवर पाहिलेला सोहळा प्रत्यक्ष अनुभवता येणार याचा आनंद शब्दातीत असल्याची मच्छिमार आणि कुटुंबियांची प्रतिक्रिया

 

गोवा खबर:गोव्यातील चार मच्छिमार दाम्पत्यांना स्वातंत्र्यदिनाचा सोहळा अनुभवण्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. सरकारने अशाप्रकारची संधी दिल्याबद्दल मच्छिमार बांधवांनी सरकारचे आभार मानले आहेत.

जो सोहळा आतापर्यंत केवळ दूरदर्शनवर अनुभवत होतो, तो प्रथमच प्रत्यक्षरित्या अनुभवायला मिळणार, याचा आनंद शब्दातीत आहे अशी प्रतिक्रिया डॉ रेणूका फर्नांडिस यांनी दिली. डॉ रेणूका यांचे पती बाणावली येथे मच्छिमारीचा व्यवसाय करतात. या व्यवसायाबद्दल आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं त्या म्हणाल्या. मच्छिमारी आपला पिढीजात व्यवसाय असल्याचे सॅबी फर्नाडिंस यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे सॅबी यांनी आभार मानले आहेत.

फ्रान्सिस्को फर्नांडिस उर्फ पेले यांनी पारंपरिक मच्छिमारांना (रापणकार) सरकार देत असल्याबद्दल सन्मानाबद्दल आभार आणि आनंद व्यक्त केला.

फिलोमेना लॉरेन्सा यांनीही सरकारच्या आमंत्रणाबद्दल आभार मानले आहेत. मच्छिमाराचे कुटुंब या नात्याने आम्हाला दिल्लीच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आमंत्रण दिल्याबद्दल सरकारचे आभारी आहोत, असे त्या म्हणाल्या.

गोव्यातून वसंत पेडणेकर आणि त्यांची पत्नी लक्ष्मी पेडणेकर, फ्रान्सिस्को फर्नांडिस आणि त्यांची पत्नी डॉ रेणूका फर्नांडिस, सॅबी फर्नांडीस आणि त्यांची पत्नी फिलोमेना वेरोनिका लॉरेन्सो आणि जेसिन्तो गुरियाओ आणि कॅसल गुरियाओ या मच्छिमार दाम्पत्याना दिल्ली स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

 

यंदा 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला देशभरातून सुमारे 1,800 विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असताना, यंदा व्हायब्रंट व्हिलेजचे सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी, मच्छीमार, नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या उभारणीत मदत करणारे श्रमयोगी, खादी क्षेत्रातील कर्मचारी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शालेय शिक्षक, सीमा रस्ते संघटनेचे कामगार आणि ज्यांनी देशाच्या विविध भागात अमृत सरोवर प्रकल्प आणि हर घर जल योजना प्रकल्पांसाठी सहाय्य आणि कार्य केले आहे त्यांना त्यांच्या जोडीदारासह या वर्षी नवी दिल्ली येथे होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

 

Trending

Exit mobile version