गोवा खबर : ११ वर्षांचा मोठा टप्पा गाठल्याबद्दल मी जीएफडीसीचे अभिनंदन करतो आणि गोव्यातील फुटबॉलच्या विकासासाठी सर्वप्रकारे सहकार्य करण्याचे वचन देतो, असे गोवा फुटबॉल विकास परिषदेचे (जीएफडीसी) अध्यक्ष ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी शनिवारी परिषदेच्या ११व्या वर्धापनदिनानिमित्त प्रतिपादन केले. त्यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे ध्येय पुढे नेण्याची आनी जीएफडीसीचे उद्दीष्ट साध्य करण्यावर जोर दिला.
11वर्षांपूर्वी पर्रीकर यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात फुटबॉलला राज्याचा खेळ म्हणून घोषित केले होते. त्याचप्रमाणे जीएफडीसी स्थापन करण्याची घोषणाही केली होती, अशी त्यांनी आठवण जागवली.
उत्सवाचा भाग म्हणून, जीएफडीसी कार्यालयात प्रार्थना करण्यात आली, ज्यात कार्यालयाची पूजा आणि आशीर्वाद इत्यादीचा समावेश होता. वर्धापनदिन सोहळ्याला उपस्थित असलेल्यांमध्ये परिषद सदस्य अर्जुन पुरस्कार जेते ब्रुनो कुतिन्हो, आवेर्तान फुर्तादो, कायतान फर्नांडिस, शांताराम नाईक, संजीव नागवेंकर, प्रदीप चोडणकर, वॅलेंत फेर्नांडिस, कॉलिन वाझ, जोवितो लोपीस आणि लॅक्टर मास्कारेन्हास यांचा समावेश होता. समारंभानंतर परिषद समितीची सभा झाली.
उपस्थितांशी संवाद साधताना शंखवाळकर म्हणाले की, ”११व्या वर्धापनदिन उत्सवाचा एक भाग म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. आम्ही एका फुटबॉल संघाप्रमाणे काम केले आहे. आम्ही बरीच उद्दिष्टे साध्य केली आहेत. जीएफडीसीचे भवितव्य ठरवायचे हे मी सरकारवर सोडतो. माझा आतापर्यंतचा कार्यकाळ फलदायी होता. मला खात्री आहे की जीएफडीसीला येत्या वर्षांमध्ये चांगले दिवस येतील, असेही शंखवाळकर म्हणाले.”
आपल्या भाषणात, जीएफडीसी सदस्य सचिव डॉ. गीता नागवेंकर म्हणाल्या, ”जीएफडीसीच्या स्थापनेचा वर्धापनदिन साजरा करताना मला खूप आनंद होत आहे. क्रीडा मंत्री येऊ शकले नाहीत, मात्र त्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्याकडे शहरी आणि ग्रामीण भागात मिळून ३५ फुटबॉल विकास केंद्र आहेत, जी समर्पित असलेल्या जीएफडीसी सदस्यांमुळे चांगली चालतात. या सर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये सबंध राज्यभरातील २००० मुले आणि १००० मुली प्रशिक्षण घेतात. एकत्रितपणे, आम्ही गोवा फुटबॉलचा वारसा अधिक उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवतो,” असेही ती म्हणाली.
”संपूर्ण गोवा राज्यात या खेळाचा प्रसार करण्याच्या स्तुत्य प्रयत्नांबद्दल जीएफडीसीचे अभिनंदन. नवोदित फुटबॉलपटूंना या खेळातून खूप लाभ होत आहे,” असेही त्या पुढे म्हणाल्या.
जीएफडीसी कर्मचारी आणि परिषद सदस्यांमध्ये एक प्रदर्शनीय सामना संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता.
जीएफडीसीची गोव्यात ३५ सक्रिय फुटबॉल प्रशिक्षण केंद्रे असून, ८३ प्रशिक्षण आहेत. ६ ते १४ वर्षे वयोगटातील २७७४ प्रशिक्षणार्थी या केंद्रांमध्ये नोंदणीकृत आहेत.