गोवा राज्यातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीची माहिती देण्यासाठी गोवा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन
कर्करोग जीवशास्त्र आणि लसीचे विकसन या क्षेत्रातील अभिनव उपक्रम सुरु करण्यात आयआयटी गोवा संस्थेची आघाडी
एनईपी 2020 च्या समावेशासंदर्भात एनआयटी गोवा ही संस्था अग्रणी, कौशल्याधारित शिक्षणाने विद्यार्थ्यांना सक्षम केले जाते
एनईपी 2020 मधील शिकणाऱ्यांवर केंद्रित दृष्टीकोनाच्या माहितीचा प्रसार करण्याचा केंद्रीय विद्यालय -आयएनएस मांडवी या संस्थेचा उद्देश
शाळेतील वर्गांना सर्जनशील शिक्षण केंद्रात रुपांतरीत करण्याचा काणकोण येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निश्चय
गोवा खबर:गोवा राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (एनईपी 2020) च्या अंमलबजावणीच्या बाबतीत झालेल्या उल्लेखनीय प्रगतीची माहिती देण्यासाठी गोव्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी एनआयटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते. यामध्ये आयआयटी गोवा संस्थेचे संचालक प्रा.बी.के.मिश्रा,आयआयटी गोवा येथील एनईपी 2020 समन्वयक डॉ. नीलकंदन, एनआयटी गोवा संस्थेचे संचालक प्रा. ओ. आर. जयस्वाल, एनआयटी गोवा येथील एनईपी 2020 समन्वयक डॉ.दामोदर रेड्डी, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश संचालक सी.एस. मूर्ती, केंद्रीय विद्यालय-आयएनएस मांडवीचे मुख्याध्यापक रवी प्रताप सिंग,आणि काणकोण येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिमेश पाल यांचा समावेश होता.
प्रा. बी. के. मिश्रा यांनी अत्यंत प्रभावीपणे आयआयटी गोवा या संस्थेने हाती घेतलेल्या अग्रणी उपक्रमांची माहिती दिली. आंतरशाखीय जीवविज्ञान(एसआयएलएस) विद्यालयाची स्थापना हा त्यापैकीच एक उपक्रम आहे. या वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक केंद्राने कर्करोग जीवशास्त्र, लस विकसन, औषध संशोधन तसेच महामारीबाबतचे मॉडेलिंग यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे. संस्थेच्या दूरदृष्टीयुक्त दृष्टीकोनात पेशींचे यांत्रिक मॉडेलिंग, रचनात्मक संरेखन घटकांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी बायोमिमेटीक माहितीचा उपयोग करून घेणे इत्यादी विषयांचा देखील समावेश आहे अशी माहिती त्यांनी दिली.
आयआयटी गोवा या संस्थेचे इंटर्नशिप धोरण विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या अंतिम वर्षात उद्योग-आधारित समस्या सोडवण्याच्या कौशल्यांची जोपासना करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.या संस्थेने परदेशी विद्यापीठांशी आंतरराष्ट्रीय सहकार्य संबंध स्थापन करण्याला प्रोत्साहन दिले आहे आणि त्यातून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रबंधविषयक कार्य अधिक समृध्द होते आणि सीमापार संशोधन संधींना प्रोत्साहन मिळते.
“आंतरशाखीय दृष्टीकोन प्राप्त करण्याचे शिक्षण (एलएएमपी)” तसेच “तंत्रज्ञान आणि समाज शिक्षण (टीएएसएलई)” यांसारख्या उल्लेखनीय अभ्यासक्रमांनी विद्यार्थ्यांना समस्यासोडवण्याची क्षमता विकसित करण्यास आणि प्रादेशिक विकासविषयक आव्हानांना परिणामकारकपद्धतीने सामोरे जाण्यास सक्षम केले आहे.
एनआयटी गोवा संस्थेचे संचालक प्रा. ओ. आर. जयस्वाल यांनी 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून एनईपी 2020 लागू करण्याबाबत संस्थेच्या खंबीर प्रतिबद्धतेवर अधिक भर दिला. या संस्थेने संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी, इलेक्ट्रोनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी आणि संगणकीय गणित यांसारख्या विशेष शाखांशी संबंधित लहान लहान कार्यक्रम सुरु केले असून त्यातून विद्यार्थ्यांच्या माहितीची कक्षा विस्तारते आणि रोजगार क्षमता सुधारते आहे.
यावेळी एन आयटी गोवा या संस्थेतर्फे, आरोग्य आणि आनंद’, ‘योग’, ‘वैदिक गणित’, ‘वैदिक साहित्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान’ तसेच ‘व्यावसायिक नीतिमूल्ये आणि मानवी मूल्ये’ यांसारख्या अभ्यासक्रमांसह भारतीय माहिती प्रणालीचे एकत्रीकरण या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांना सर्वांसमोर ठळकपणे मांडण्यात आले. लवचिक आणि आंतर-शाखीय शिक्षण पद्धतीवर संस्थेने लक्ष केंद्रित केल्यामुळे विद्यार्थ्यांना निवडक आणि मुक्त अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते आणि त्याहून समग्र शिक्षणाची जोपासना होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या शिक्षण मध्ये सोडण्याविषयीच्या अनेक पर्यायांच्या दृष्टीचे पालन करून, गोव्याच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांनंतर अभ्यासक्रम पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रमाणपत्रे आणि पदविका प्रमाणपत्रे देते. हा दृष्टीकोन विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायात गुंतण्यासाठी तात्पुरत्या कालावधीकरिता अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याची आणि त्यांचे पदवी पूर्ण करण्यासाठी विहित मुदतीत परत येण्याची सोय उपलब्ध करून देतो. स्नातक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी “पर्यावरण अभ्यास” या समर्पित अभ्यासक्रमाद्वारे पर्यावरणीय शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
INS मांडवी येथील केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य रवी प्रताप सिंग यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणीतील विद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी सामाईक केली. 5+3+3+4 पद्धतीने प्रवेशाचे वय पुनर्संरेखित करणे आणि निपुण उपक्रम (मुलांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचे ज्ञान देणारा राष्ट्रीय उपक्रम) ची सुरुवात यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा प्रभावी मागोवा घेण्यास हातभार लागला आहे.
केंद्रीय विद्यालयांनी प्रायोगिक तत्त्वावर 3+, 4+ आणि 5+ वयोगटांसाठी बालवाटिका वर्ग सुरू केले आहेत. हे वर्ग राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा (NCERT) अभ्यासक्रम आणि संसाधनाचा उपयोग करून खेळावर आधारित शिक्षणाला समर्थन देतात. विद्या प्रवेश हा इयत्ता पहिली पूर्वी 3 महिन्यांचे शालेय तयारी करून घेणारे प्रारुप मुलांमध्ये पूर्व-साक्षरता, पूर्व-संख्या ज्ञान, संज्ञानात्मक ज्ञान आणि सामाजिक कौशल्ये वाढवते. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर फाऊंडेशनल स्टेज (NCF FS) ची अंमलबजावणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अध्यापनशास्त्राशी संरेखित करते आणि विद्यार्थी – केंद्रित दृष्टिकोनाला प्रोत्साहन देते.
काणकोण इथल्या जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य अनिमेश पाल यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या तत्त्वांप्रती विद्यालयाची अतूट बांधिलकी अधोरेखित केली. भाषा, विज्ञान आणि गणित यांसारख्या मुख्य विषयांमध्ये सक्षमता-आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित केल्याने अध्ययनाच्या दृष्टीकोनात बदल झाला आहे तसेच घोकंपट्टी करून शिकण्यापेक्षा संकल्पना समजून घेण्यावर भर दिला जात आहे.
DIKSHA पोर्टलवरून आवश्यक निरंतर व्यावसायिक विकास प्रशिक्षण (CPD) प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीशी संरेखित केले आहे. CBSE द्वारे देण्यात आलेल्या मुख्याध्यापकांच्या नेतृत्व विकास प्रशिक्षणाने शाळा व्यवस्थापन प्रभावीपणे सुधारले आहे.
कला-एकात्मिक, खेळ-एकात्मिक, खेळणी-आधारित अध्यापनशास्त्र, आणि अनुभवात्मक शिक्षण प्रणालीमुळे वर्गात आनंद आणि सर्जनशीलता तयार झाली आहे. यामुळे जीवन कौशल्ये, मूल्य, लिंग संवेदनशीलता आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता देखील वाढवली आहे. आधुनिक शिक्षण पद्धतींचा स्वीकार करून पारंपरिक वर्गांचे डिजिटल वर्गांमध्ये रुपांतर झाले आहे.
हस्तशिल्प, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक तसेच ग्रंथालय आणि माहिती विज्ञान असे विद्यार्थ्यांच्या विविध आवडी पूर्ण वेगवेगळे कौशल्य विषय सुरू करण्यात आले आहेत. विविध स्वयंसेवी संस्थांद्वारे समर्थित JEE आणि NEET साठी सुरू करण्यात आलेल्या विशेष वर्गांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या उच्च शिक्षणाच्या आकांक्षांचा पाठपुरावा करणे सुलभ बनले आहे. परदेशात उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत सहाय्य देणारी TATA-कर्ता या स्वयंसेवी संघटनेसोबतच्या सहकार्यावरही पाल यांनी प्रकाश टाकला.
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे प्रादेशिक संचालक सी.एस. मूर्ती यांनी गोव्यातील सामान्य शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षणाच्या यशस्वी एकत्रीकरणावर प्रकाश टाकला. या एकत्रीकरणामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये निवडताना अनेक पर्याय उपलब्ध होतात. तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांचे शिकण्याचे अनुभव लक्षणीयरीत्या समृद्ध झाले आहेत.
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने कौशल्य हब सुरू केल्याने विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण तसेच उच्च कौशल्याच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. विद्यार्थिनींसाठी परीक्षा आणि शैक्षणिक शुल्कात सूट दिल्यामुळे व्यावसायिक शिक्षणामध्ये लैंगिक सक्षमीकरण होत आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गोव्यातील शैक्षणिक संस्थांचे सामूहिक समर्पण या पत्रकार परिषदेत दिसून आले. शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.