गोवा खबर

गोव्यामधील 14 व्या स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय बैठक आणि आठव्या मिशन इनोव्हेशन बैठकीत भारताची शून्य उत्सर्जनाची कृती योजना, बॅटरी तंत्रज्ञानामधील प्रगती आणि धोरण समर्थनावर चर्चा

Published

on

Spread the love

 

उपकरणांच्या वाढत्या मागणीचा ऊर्जा प्रणालीवर पडत असलेला प्रभाव बीईई प्रमुखांनी केला अधोरेखित

जागतिक ऊर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरण संवेदनशीलता प्राप्त करण्यामधील अती-कार्यक्षम उपकरणांच्या महत्वाच्या भूमिकेवर बैठकीत एकमत

 

गोवा खबर:गोव्यामध्ये सुरु असलेल्या 14 व्या स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय बैठक आणि आठव्या मिशन इनोव्हेशन बैठकीच्या दुसऱ्या दिवशी 20 जुलै 2023 रोजी, स्वच्छ ऊर्जा संक्रमण धोरणांबाबतच्या गंभीर मुद्द्यांवर भर देण्यात आला.

“जागतिक स्वच्छ ऊर्जा उपयोजन आणि हवामान उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक ऊर्जा परस्पर-जोडणीला गती देणे”, या विषयावर आधारित सत्रात, स्वच्छ ऊर्जा नेटवर्कची सीमापार जोडणी उभारण्याच्या गरजेवर भर देत, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी ऊर्जा सेवांच्या असलेल्या महत्वावर बैठकीत  विचारमंथन झाले.

या परस्पर जोडलेल्या प्रणालीमुळे व्यापक स्तरावर शाश्वतता वाढेल आणि खर्च कमी होईल,  त्याच वेळी स्वच्छ ऊर्जा विकासाचे आणि ऊर्जा संक्रमणाद्वारे निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनाचे  उदिष्ट साध्य करायला मदत होईल. एकमेकांशी जोडलेल्या ऊर्जा प्रणालींमध्ये औद्योगिक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन रोखण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्युतीकरण हे एक प्रमुख धोरण म्हणून निश्चित करण्यात आले.

डिजिटलायझेशन, अल्ट्रा-हाय व्होल्टेज तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा हे एकात्मिक ऊर्जा प्रणालीचे यशस्वी कार्यान्वयन आणि लवचिकतेसाठी आवश्यक घटक आहेत, यावर बैठकीत   एकमत झाले.

युएई चे COP28 अध्यक्षपद आणि UNEP-च्या नेतृत्वाखालील कुलिंग (शीतकरण) गटाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सरकार, खासगी क्षेत्र आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी न्याय्य आणि समन्यायी ऊर्जा संक्रमणाचे उद्दिष्ट गाठताना शाश्वत कुलिंगला  (तापमानवाढ कमी करणे) गती देण्यासाठी कोणती कृती आवश्यक आहे यावर बैठकीत   विचार मांडले.

 

COP28 युएई अध्यक्षतेने सर्व देशांना ग्लोबल कूलिंग प्लेजला (जागतिक तापमान वाढ रोखण्याची प्रतिज्ञा) पाठिंबा देण्याचे आवाहन केले. ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि शाश्वत शीतकरण वाढवण्यासाठी महत्त्वाकांक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे, हे याचे उदिष्ट आहे.

भारत, फ्रान्स आणि नॉर्वेने दाखवून दिले, की हे स्थित्यंतर आज साध्य करण्याजोगे आहे. यासाठी भारताच्या कुलिंग (शीतकरण) कृती योजनेचे उदाहरण देण्यात आले, एखाद्या देशाने राबवलेली अशा प्रकारची ही पहिलीच सर्वसमावेशक शीतकरण योजना आहे.

ग्रीन पॉवर्ड फ्यूचर मिशन (GPFM), किफायतशीरपणा सुनिश्चित करून, जगभरात 100% परिवर्तनीय अक्षय ऊर्जा एकत्रित करण्याचे उद्दिष्ट ठेवणे, लवचिकता आणि टिकाऊपणा या मुद्द्यांवर बैठकीत   चर्चेत भर देण्यात आला. उद्दिष्टांमध्ये विश्वासार्ह अक्षय ऊर्जा, प्रणालीची लवचिकता आणि ऊर्जा जोडणीसाठी डिजिटलायझेशन, याचा समावेश आहे.   

भारत सरकारच्या ऊर्जा कार्यक्षमता संस्थेच्या महासंचालकांनी, वीज पुरवठादारांपुढील मोठी आव्हाने टाळण्यासाठी उपकरणाच्या वापराचे नियमन आणि अनुकूलन करण्याच्या गरजेवर भर दिला. 2040 पर्यंत भारतामध्ये उपकरणांच्या मागणीत आठ पट वाढ होण्याची अपेक्षा असून, त्यामुळे विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ होईल. यावर उपाय शोधण्यासाठी आणि भविष्यातील संभाव्य वीज संकट टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

मंत्रीस्तरीय बैठकीबरोबरच , “प्रेरणादायी बदल: लिंगभाव समानतेपुढील अडथळे दूर करणे”, या विषयावर आयोजितएका  कार्यक्रमात, सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था, युवा संस्था आणि व्यवसायांमधील मान्यवर एकत्र आले, आणि त्यांनी ऊर्जा क्षेत्रातील लिंगभाव असमानतेच्या समस्येवर आपले विचार मांडले. 

 

या कार्यक्रमात इक्वल बाय 30 मोहिमेचा पाचवा वर्धापन दिवस साजरा केला, आणि बहुप्रतीक्षित इक्वल बाय 30 स्वयं मूल्यमापन साधनाचे अनावरण केले. या कार्यक्रमात 2030 पर्यंत लिंग भेद कमी करण्यासाठी स्वाक्षरी करणाऱ्यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचा मागोवा घेतला.

गोव्यामधील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम मध्ये, आयोजित इलेक्ट्रिक मोबिलिटीबाबत जागरुकता निर्माण करणारे प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. वाहन आणि चार्जिंग पायाभूत सुविधा, मिशन नवोन्मेष आणि क्लीन टेक स्टार्ट-अप या तीन विभागांमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.     

Trending

Exit mobile version