पणजीत आयोजित कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व अभाविपचे पूर्व राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती
गोवा खबर:अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या वर्षी आपला ७५ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. अभाविप ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना १९४९ मध्ये स्थापन झाल्यापासून ७५ वर्षांमध्ये पदार्पण करत आहे. या निमित्ताने, अभाविप गोवा सर्व वर्तमान आणि पूर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व अभाविपचे पूर्व राष्ट्रीय महामंत्री श्री. विनोद तावडे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अभाविप राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार उपस्थित राहणार आहेत.
६ जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत अभाविप गोवा संयोजक धनश्री मांद्रेकर, उत्तर गोवा संयोजक सुदीप नाईक, दक्षिण गोवा संयोजक अक्षय शेट व पणजी महानगर मंत्री वैभव साळगांवकर उपस्थित होते. धनश्री मांद्रेकर यांनी सांगितले की हा मेळावा 9 जुलै 2023 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत पणजी, गोवा येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला अभाविपचे वर्तमान व पूर्व कार्यकर्त्यांसमोर संघटनेच्या कामगिरीचा आणि राष्ट्रासाठी केलेल्या योगदानाचा आढावा घेतला जाईल.
अभाविप ने शैक्षणिक सुधारणांसाठी, शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध लढा देण्यासाठी तसेच बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरी, दहशतवाद, माओवादी हिंसाचार, श्रीरामजन्मभूमी आंदोलन, कलम 370 रद्द करणे आणि फुटीरतावादी प्रवृत्तींसह राष्ट्रासमोरील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अभाविपच्या माध्यमातून कलागुणांना वाव देणे, क्रीडा संमेलने, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम, करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक स्पर्धा आयोजित केले जात आहे. अभाविप ने मागिल ७५ वर्षात समाजाच्या विविध क्षेत्रातील दिग्गज नेते घडवले आहेत जे सामान्य कुटुंबातील आणि बिगर राजकीय पार्श्वभूमीचे आहेत.
गोव्यात अभाविप अनेक वर्षांपासून विद्यार्थी आणि समाजहितासाठी सक्रियपणे काम करत आहे. हाफ तिकीट आंदोलन, कोंकण रेल्वे आंदोलन, नायलॉन 6,6 आंदोलन, झेवियर्स कॉलेजमधील विद्यार्थी न्याय आंदोलन अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये अभाविपने मोठी भूमिका बजावली आहे. अलीकडे अभाविपने अनेक विद्यार्थी कल्याण कार्यक्रम आणि विद्यार्थी आंदोलने आयोजित करण्यात सक्रिय आहे. मागील आठवड्यात, अभाविप ने डॉन बॉस्को कॉलेज पणजीत फी रचनेच्या मुद्द्यावर यशस्वीपणे हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांची 25 लाख एवढी फी रक्कम वाचवली. अभाविप गोवा स्थापनेची 75 वर्षे साजरी करत असताना वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित करेल. अभाविप या वर्षी महाविद्यालये आणि गोवा विद्यापीठातील सर्व विद्यार्थी निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने सहभागी होण्यासाठी आणि जिंकण्यासाठी कटिबद्ध आहे. वर्षानुवर्षे अभाविप अधिक मजबूत होईल आणि विद्यार्थ्यांचा आवाज मोठ्या व्यासपीठावर घेईल असे अभाविप गोवा संयोजक धनश्री मांद्रेकर यांनी सांगितले.
सर्व कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना 9 जुलै 2023 रोजी होणाऱ्या भव्य मेळाव्यात सामील व्हावे असे आवाहन अभाविप गोव्याच्या वतीने करण्यात आले आहे.