आपल्या मुलाला प्रवेश देण्यासाठी कारे कायदा महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मोडले नियम; त्यांना निलंबित करा
गोवा खबर: कारे कायदा महाविद्यालयाच्याच्या प्राचार्याने आपल्या मुलाला कायदा महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षेत फेरफार केल्याचा आरोप एनएसयुआयने केला आहे आणि या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गोवा विद्यापीठाच्या रजिस्ट्रारांची भेट घेतल्यानंतर एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांच्यासह इतरांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली आणि उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा विद्यापीठाने या प्रकरणात हस्तक्षेप करून संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करावी, असे सांगितले.
“यावेळी बीए-एलएलबीची प्रवेश परीक्षा कारे कायदा महाविद्यालयाने घेतली होती. परंतु त्यांनी ही परीक्षा नियमानुसार आयोजित केले नव्हती. बोर्ड परीक्षा आणि प्रवेश परीक्षांचे मूल्यांकन 50-50 च्या आधारावर केले पहिजे, पण तसे करण्यात आलेले नाही,” असा त्यांनी आरोप केला.
नौशाद चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, बोर्डाच्या परीक्षेत कमी गुण मिळवणाऱ्या आपल्या मुलाला प्रवेश मिळवून देण्यासाठी कारे कायदा महाविद्यालयाच्या प्राचार्याने नियम बदलले.
“त्यामुळे त्यानी बोर्डाच्या परीक्षेतील गुणांचा विचार केला नाही आणि ज्यांनी प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवले त्यांनाच संधी दिली गेली,” असे ते म्हणाले.
नौशाद चौधरी म्हणाले की, गोवा विद्यापीठ कायदा आणि गोवा बोर्ड कायद्यानुसार मुख्याध्यापकांनी परीक्षेचे पेपर सेट करणे बेकायदेशीर आहे, कारण त्यांचा मुलगा परीक्षा देणार होता.
“ही संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही चौकशीची मागणी करतो,” असे ते म्हणाले.
एनएसयूआयने खालील मागण्या केल्या आहेत;
१) या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून प्राचार्यावर कारवाई करावी.
२) मूल्यमापन प्रक्रियेत बदल करून पात्र विद्यार्थ्यांना सामावून घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्या.
3) पुढील शैक्षणिक वर्षापासून गोवा विद्यापीठानेच ही परिक्षा घ्यावी.
या प्रकरणाची चौकशी करण्यात सरकार अपयशी ठरल्यास एनएसयूआय पुढचे पाऊल उचलेल आणि न्यायालयातही जाणार, असेही ते म्हणाले.