गोवा खबर

सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग दिनाचे औचित्य साधत राज्य दिव्यांगजन आयोगाच्या वतीने दिव्यांगजनांसाठी खासगी क्षेत्रात रोजगार संधीविषयक उपक्रमाचे आयोजन

Published

on

Spread the love

 

गोवा खबर: राज्य दिव्यांगजन आयोगाच्या वतीने गोवा राज्य उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाच्या सहकार्याने सूक्ष्म-लघु-मध्ये उद्योग (एमएसएमई) दिनाचे औचीत्य साधत २७ जून २०२३ रोजी पणजी येथील ईडीसी हाऊसमध्ये “खासगी क्षेत्रात दिव्यांगजनांसाठी रोजगार संधी” या विषयावर एका मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या तसेच राज्य उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाच्या संचालिका श्वेतिका सचान (आयएएस), विशेष अतिथी म्हणून राज्य दिव्यांगजन आयोगाचे सचिव ताहा हाजिक, सन्माननीय अतिथी म्हणून गोवा राज्य उद्योग संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचर, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष तसेच बीएनआय गोवा विभागाचे कार्यकारी संचालक राजकुमार कामत, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक (आयएएस) आणि गोवा चेंबर ऑफ कॉर्मर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राल्फ डिसोझा यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी, व्यावसायिक आणि एमएसएमईचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

शाश्वत विकास उद्दिष्टांची पूर्तता करण्याबरोबरच सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि लाखो लोकांना उपजिविका उपलब्ध करणे यासाठी सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांची भूमिका आणि त्यांच्याकडील संधी याबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने या सत्राचे आयोजन करण्यात आले. तसेच खासगी क्षेत्रामध्ये दिव्यांगजनांना रोजगार संधी उपलब्ध करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित करण्याबाबतही या सत्रामध्ये भर देण्यात आले.

खासगी क्षेत्रात दिव्यांगजनांना रोजगारसंधी उपलब्ध करण्यासाठी नियोजन करण्याबाबत गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, बीएनआय आणि जीआयडीसी यांना आपला सहकार्य करण्याची हमी राज्य दिव्यांगजन आयोगाचे सचिव ताहा हाजिक यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, “मी देशभर फिरलो आहे आणि विविध वृत्ती, विचाराच्या लोकांना भेटलो आहे. पण गोवा हे राज्य अद्वितीय आहे. गोवा राज्य सर्वांनाच आपले करून घेते.” ते पुढे म्हणाले, “असे असताना मग आपण गोवा राज्याला सर्वसमावेशक राज्य बनवले पाहिजे. ही सर्वसमावेशकता केवळ दानधर्मापुरती नको तर नागरिकांचा मूलभूत अधिकार म्हणून या सर्वसमावेशकतेचा विकास केला पाहिजे. दिव्यांगजनांचे सक्षमीकरण करणे आणि समाजात त्यांना मानसन्मानाने वावरण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती करणे ही गरज आहे. त्यामुळेच आजच्या सत्राचा मूळ विषय हा खासगी क्षेत्रामध्ये दिव्यांगजनांसाठी रोजगारसंधी हा ठेवण्यात आला आहे.”

याप्रसंगी गोवा औद्योगिक विकास महामंडलाचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक (आयएएस) म्हणाले, “राज्यातील सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग, व्यवसायांसाठी राज्यामध्ये आपल्या उत्पादन-सेवांचे प्रदर्शन करण्यासाठी, ग्राहकांना आकर्षित करत आपली क्षमता दाखवण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे म्हणून एमएमएमई एक्स्पो उपक्रम राबवण्याचे आयडीसीचे धोरण आहे. राज्यामध्ये व्यवसायसुलभता वाढवण्यासाठी आम्ही विविध कायदा, नियमांमध्ये सुलभता आणत असून यासाठी आयडीसीचे नवे पोर्टल सुरू करत आहोत. राज्य उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालय (डीआयटीसी)च्या सहकार्याने गोवा राज्य एक आकर्षक व्यावसायिक केंद्र म्हणून घडवण्यात यश मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.”

या कार्यक्रमामध्ये खासगी क्षेत्रामध्ये दिव्यांगजनांसाठी रोजगार संधी निर्माण करण्याविषयक ताहा हासिक यांनी मार्गदर्शन केले. तसेच यशवत तुयेंकर यांनी सूक्ष्म व्यावसायिकांसाठी लागू असलेल्या अन्न प्रक्रिया योजनेविषयी माहिती दिली.

Trending

Exit mobile version