गोवा खबर

मांद्रेत वारंवार वीज खंडित, काँग्रेसचा आंदोलन करण्याचा इशारा

Published

on

Spread the love
गोवा खबर : मांद्रे येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे मांद्रे काँग्रेस समितीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच येथील महिलांनी या सरकारला वीज पुरवठा सुरळीत करण्यातही अपयश आल्याचे म्हटले.
वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि गृहिणींचा टिफिन तयार करण्यावर परिणाम होत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
मांद्रे काँग्रेसचे गटाध्यक्ष नारायण रेडकर यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन अखंडित वीजपुरवठा देण्यास सांगितले.
जिल्हा सरचिटणीस प्रणव परब, मिंगेल फर्नांडिस, रामचंद्र पालयेकर, अरुण वस्त, बाबुसो तळकर, प्रदीप सावंत, दिनेश नार्वेकर, जॉन डिसूझा व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
कावेरी धुरी, नविता ठाकूर, जॅकीन डिसूझा, प्रिती रेडकर अश्विनी तळकर, रिमा हरजी, दीपिका वांयगणकर, सेजल ठाकूर, लेटिसिया रॉड्रिग्ज, सुरिया नाईक आणि शशिकला नाईक यांनी अखंडित वीज न पुरवल्याबद्दल अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला.
नारायण रेडकर म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून मांद्रेवासियांना वीज पुरवठ्याचा प्रश्न भेडसावत आहे, मात्र वीज विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
“अनेकदा दुरुस्तीच्या नावाने विभागाकडून वीज पुरवठा बंद केला जातो. परंतु प्रत्येकजण वर्तमानपत्र वाचत नसल्याने लोकांना याबद्दल माहिती मिळत नाही. वीज विभागाने यासाठी गावात वाहन फिरवून ऑडिओच्या माध्यमातून याची माहिती द्यायला हवी,” असे ते म्हणाले.
 ते म्हणाले की, वीज खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करता येत नाही आणि गृहिणींना स्वयंपाकही करता येत नाही. ‘आम्हाला सुरळीत वीज पुरवठा हवा आहे,’’ असे ते म्हणाले.
ही समस्या सोडवली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.
प्रणव परब म्हणाले की, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने गरीबांचे हाल होत आहेत. पंखेही चालवता येत नसल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सरकार याबाबत असंवेदनशील बनले आहे.
“ वीज मंत्र्यांना खातं सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी परब यांनी केली.
मांद्रे येथील विद्युत विभागात गेलेल्या महिलांनी ‘अच्छे दिन’ देण्यास सरकार अपयशी ठरल्याचे सांगत रोष व्यक्त केला.
“आम्ही आमच्या कुटुंबासाठी अन्न शिजवू शकत नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. रात्रीच्या वेळी रॉकेलच्या दिव्यांवर अवलंबून राहावे लागते,” अशी तक्रार महिलांनी केली.

Trending

Exit mobile version