गोवा खबर:स्वातंत्र्यसैनिक श्री प्रभाकर नाईक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या नवजीवन सोसायटीच्या इतर सदस्यांनी गोवा क्रांती दिनानिमित्त आग्वादबार्देश येथील ऐतिहासिक आग्वाद किल्ल्यावरील डॉ राम मनोहर लोहिया यांच्या पुतळ्यावर पुष्पांजली वाहिली. गोवा क्रांती दिवसदरवर्षी १८जून रोजी गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो.
गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून देताना श्री प्रभाकर नाईक यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले होते आणि हा त्यांचा आतापर्यंतचा सर्वात कठीण काळ होता असे त्यांनी सांगितले. डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यातील जनतेला दिलेल्या हाकेने प्रत्येक गोमंतकींयाना जागृत करून वसाहतवादी राजवटीचा प्रतिकार करण्यासाठी आणि गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त करण्यात योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. या हाकेने अनेक गोमंतकीयांना प्रेरित केलेआणि परिणामी गोवा राज्य १९ डिसेंबर १९६१ रोजी मुक्त झाले.
यावेळी स्वातंत्र्यसैनिकांच्या नवजीवन संस्थेचे सदस्य श्री अजित नार्वेकर, श्री दौलतराव राणे, श्री दशरथ नाईक आणि धीरज पेडणेकर उपस्थित होते.