गोवा खबर:कृषी मंत्री श्री रवी नाईक यांनी गोवा क्रांती दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाने एकतेची भावना जपून राज्यातील शांतता, जातीय सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. शांतता आणि जातीय सलोखा राखण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे आणि एकत्र काम करावे आणि राज्याच्या प्रगती आणि भरभराटीसाठी स्वतः समर्पित होण्याचेआवाहन त्यांनी केले.
सर्व धर्म आणि जातीच्या लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोख्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
फोंडा येथे गोवा क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात क्रांती मैदान, फोंडा येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर श्री. नाईक बोलत होते.
गोवा मुक्त करण्यात आपले रक्त सांडणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करताना श्री नाईक यांनी महान राष्ट्रवादी आणि स्वातंत्र्यसैनिक डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलियो मिनेझिसयांनी पोर्तुगिज राजवटीतून गोवा मुक्त करण्यासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण केले आणि त्याची फळे आज आपण उपभोगत आहोत असे ते म्हणाले.
श्री. नाईक पुढे म्हणाले की, गोव्याने भौगोलिकदृष्ट्या लहान राज्य असूनही शिक्षण, संस्कृती, क्रीडा आणि आरोग्य या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय विकास सादलेला आहे. केंद्र सरकारने गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आम्हाला मोठा फायदा होत आहे. श्री. नाईक पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगभरात आदर केला जातो आणि त्यांनी आपल्या देशाचे नेतृत्व करण्यासाठी जनतेला त्यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. विकासासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन काम करावेअसे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थितांमध्ये फोंडा नगरपालिकेचे अध्यक्ष श्री रितेश नाईक, कमांडिंग ऑफिसर ६टीटीआर, फोंडा, कर्नल जसविंदर सिंग, जि.पंचायत सदस्य, सरपंच, सरकारी अधिकारी, माजी आमदार आणि गोवा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचेसरचिटणीस श्री रोहिदास नाईक, स्वातंत्र्य सैनिक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी फोंडा येथील विविध माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.
सुरवातीसकृषी मंत्र्यांचे क्रांती मैदानावर आगमन झाल्यावरअतिरिक्त जिल्हाधिकारी श्री विशाल कुंडईकर, उपजिल्हाधिकारी श्री रघुराज ए. फळदेसाई आणि उपअधिक्षक श्री आशिष शिरोडकर यांनी त्यांचे स्वागत केले.