गोवा खबर: राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी स्वातंत्र्य हे केवळ राजकीयच नाही तर सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य असल्याचे सांगितले. गोवा क्रांती दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात आझाद मैदान पणजी येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली अर्पण केल्यानंतर ते बोलत होते.
आपली व्यवस्था दिवसेंदिवस विकसित होत आहे असे आपण अभिमानाने म्हणू शकतो आणि आपली भारतीय राज्यघटना जगातील सर्वोत्कृष्ट संविधानांपैकी एक म्हणून स्वीकारली गेली आहे. राज्यात विद्यमान सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल आनंद व्यक्त करून ते म्हणाले कीसत्ताधारी आणि विरोधक या दोघांची मने नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर रुंदावत असतात. राज्यपालांनी डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलियो मिनेझिस यांच्या पोर्तुगीज राजवटीविरुद्ध लढलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविले पाहिजेअसे सांगितले. सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले गोवा देशातील सर्वोत्कृष्ट, संपन्न राज्य बनवू शकेलअसे ते म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा क्रांती दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करताना सांगितले की, १८जून १९४६ रोजी डॉ राम मनोहर लोहिया आणि डॉ ज्युलियो मिनेझिस यांनी पोर्तुगीजांच्या छळाचा प्रतिकार करण्यासाठी पुढाकार घेतला आणि पोर्तुगीजांकडून आपले राज्य परत घेण्यासाठीगोव्यातील जनतेने जनक्रांती सुरू केली.
गोवा दमण आणि दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष गुरुदास कुंदे यांच्या मागणीसंबधी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावीच्या इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकात गोवा क्रांती दिनाचा इतिहास समाविष्ट करण्यात येणार असल्याची घोषणा केली. सध्या गोवा क्रांती दिनाचा इतिहास चौथी इयत्तेच्या गोमंतक भाल भारती पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहेअशी माहिती त्यांनी दिली. स्वातंत्र्यसैनिकांवर अन्याय होणार नाहीअशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी दीड महिन्याच्या आत स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रलंबित पेन्शनवर तातडीने तोडगा घेतला जाईलअसे सांगितले. राज्य सरकारकडे प्रलंबित असलेले स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचे सर्व १०० अर्ज एका वर्षात निकाली काढले जातील आणि अर्जदारांना १८ जून २०२४ पूर्वी कामावर रुजू केले जाईलअसेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
गोवा दमण आणि दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री गुरुदास कुंदे यांनी गोवा मुक्तीसाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण केले आणि गोवा क्रांती दिनाच्या इतिहासावरही प्रकाश टाकला.
यावेळी पर्यटन मंत्री श्री रोहन खवंटे, वीजमंत्री श्री रामकृष्ण उर्फ सुदीन ढवळीकर, विरोधी पक्षनेते श्री युरी आलेमाव, पणजीचे महापौर श्री रोहित मोन्सेरात, सांताक्रुजचे आमदार श्री रुडॉल्फ फर्नांडिस, डीजीपी गोवा आयपीएस श्री. जसपाल सिंग व इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.खोर्ली तिसवाडी भालभवन समुहाने देशभक्तीपर गीत सादर केले.श्रीमती अक्षता पुराणिक भट यांनी सूत्रसंचालन केले.