गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निवृत्त पत्रकारांसाठी 10 हजार रुपयांची पेंशन जाहीर केली. तसेच त्यांच्या कुटुंबियांना 5 हजार रुपयांची पेंशन देण्याची घोषणा केली. याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे अभिनंदन करत असल्याचे प्रसिद्धी पत्रक भाजपाच्या प्रसिद्धी माध्यम विभागाचे समन्वयक संदेश साधले यांनी दिले आहे.
पत्रकार लोकशाहीचा स्तंभ मानला जातो. उन्ह, पाऊस किंवा थंडी याचा विचार न करता समाजात घडणारी प्रत्येक घटना पत्रकार आपल्यापर्यंत पोहोचवतो. अनेकदा आपला जीव धोक्यात घालून प्रसंगी उपाशीपोटी लोकांपर्यंत बातमी देण्याचे काम पत्रकार करत असतात. डॉ. सावंत यांनी निवृत्ती पेंशन जाहीर करून राज्यातील पत्रकारांना दिलासा देण्याचे मोठे काम केले आहे, असे साधले यांनी पत्रकात म्हटले आहे.
निवृत्तीनंतर पत्रकारांना कोणतीही पेंशन अथवा भत्ता मिळत नाही. अनेक पत्रकार खास करुन ग्रामीण भागातील पत्रकार निवृत्तीनंतरही काम करताना दिसून येतात. यासाठी समाजातील अत्यंत महत्त्वाच्या या घटकाला सहकार्याचा हात देण्याचे काम मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केल्याचे या पत्रकात नमूद केले आहे.