गोवा खबर:पर्यटन मंत्री श्री रोहन खंवटे यांनी आज पर्यटन खात्याने गोवा विद्यापिठात आयोजित केलेल्या युवा टुरिझम क्लबाच्या बैठकीस उपस्थित राहून क्लबाचा भाग असलेल्या विविध शाळां आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना पर्यटन मंत्री श्री रोहन खंवटे यांनी युवा टुरिझम क्लबाचे सदस्य देशातील पर्यटनास चालना देण्यास महत्वाचे योगदान देऊ शकतात आणि हाच उद्देश नजरेसमोर ठेऊन आझादी का अमृत महोत्सवानिमत्ताने शाळा, म्हाविद्यालये आणि इतर संस्थांनी युवा टुरिझम क्लबाची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. गोव्यात समृद्ध संस्कृती आणि परंपरेचा वारसा लाभलेला असून त्याचा प्रचार करण्याची गरज आहे. आपल्याला अध्यात्मिक, आरोग्य, कॉर्पोरेट इव्हेंट्स, इको टुरिझमवर भर देण्याची गरज आहे असे पर्यटन मंत्र्यानी सांगितले.
गोव्याच्या पर्यटन क्षेत्रास पुढे नेण्यासाठी नवीन कल्पना आणि प्रकल्प विकसित करणाऱ्या तरूणांची गरज आहे. गोव्याची खास ओळख आणि प्रतिमा राखून ठेवण्याची जबाबदारी आमच्या युवकांची आहे, असेही त्यांनी सांगितले.
पर्यटन संचालक श्री सुनिल अंचिपाक यांनी भारतीय पर्यटनाच्या क्षेत्रात युवा राजदूत तयार करणे हा युवा टुरिझम क्लबचा उद्देश असल्याचें सांगून तरूणामध्ये नवीन कल्पना आणि योजना निर्माण करण्याची भरपूर क्षमता असल्याचे सांगितले. पर्यटन व्यवसाय हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेस मोठा हातभार लावतो तसेच सुमारे ३५% रोजगार या क्षेत्रातून निर्माण होतो असे त्यांनी सांगितले.
उच्च शिक्षण संचालनालयाचे अतिरिक्त संचालक प्रो. जेर्वासियो मेंडिस, गोवा विद्यापीठाचे डीन श्री विद्यादत्त वेरेंकर, गोवा विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नितीन सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.