गोवा खबर : विद्युत केबल टाकताना निर्माण झालेला गोंधळ दूर न केल्यास आणि रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस समिती व मांद्रे गट कांग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
मांद्र गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष नारायण रेडकर यांनी सांगितले की, सध्या रस्ते खोदाईचे काम सुरू असल्याने लोकांना त्रास होत आहे.
“आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाला निवेदन दिले आहे आणि त्यांना रस्ते दुरुस्त करण्याची विनंती केली आहे. ते करण्यात अयशस्वी झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, ” असे ते म्हणाले.
“विद्युत केबल टाकताना रस्ते खोदल्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. कंत्राटदार लोकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करीत आहे आणि रस्त्यांची दुरुस्तीही करत नाही. यासाठी लोकांना अपघात होत आहेत,” असे रेडकर म्हणाले.
ते म्हणाले की सार्वजनिक बांधकाम खात्याने 9 जून पर्यंत रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांनी पूर्ण केले नाही.
“ आता अधिका-यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की ते रस्ते दुरुस्त करतील. आम्ही वाट पाहू आणि जर ते अयशस्वी झाले तर आम्ही आंदोलन करू, ” असे रेडकर म्हणाले.
बाबी बागकर म्हणाले की, रस्ते खोदल्यामुळे मांद्रे मतदारसंघ आणि संपूर्ण पेडणे परिसराचे नुकसान होत आहे. “काम पूर्ण करणे ही खात्याची जबाबदारी आहे.” असे ते म्हणाले.
उत्तर गोवा जिल्हा सरचिटणीस प्रणव परब, मिंगेल फर्नांडिस, बाबुसो तळकर, गंगाराम मांद्रेकर, रामचंद्र पालयेकर आदी यावेळी उपस्थित होते.
“विद्युत विभागाकडून बहुतांश रस्ते खोदण्यात आल्याने आणि संबंधित विभाग/कंत्राटदाराकडून काम व्यवस्थित पूर्ण न केल्यामुळे दररोज अनेक अपघात होत आहेत. मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे की, खोदाईमुळे रस्त्याच्या कडेला असलेली गटरं भरली आहेत आणि त्यामुळे नियमित पाऊस पडू लागल्यावर रस्ते ये-जा करण्यासाठी धोकादायक बनलेत,” असे निवेदनात म्हटले आहे.
“अपूर्ण कामामुळे आणि रस्त्यावरील चिखलामुळे होणारे अपघात आणि घटनांची संख्या चिंताजनक आहे,” असे पुढे म्हटले आहे.