गोवा खबर:वाहतूकमंत्री श्री माविन गुदिन्हो यांनी पर्वरी येथील सचिवालयातील परिषदगृहात १० स्पीड पोर्टेबल स्पीड रडार गन पोलीस खात्याला सुपूर्द केल्या. प्रसार माध्यमांना संबोधित करताना श्री माविन गुदिन्हो म्हणाले की रस्त्यावर शिस्त लावण्यासाठी वाहतूक खाते विविध गोष्टींवर काम करीत आहे आणि या पोर्टेबल स्पीड रडार गनमुळे वेगवान वाहने ओळखण्यास मदत होईल. रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूच्या वाढीबद्दल चिंता व्यक्त करून त्यांनी सांगितले की २०२२ मध्ये ३००७ रस्ते अपघात झाले आणि २५१ लोकांचा मृत्यू झाला. बेशिस्तपणे वाहन चालविणे आणि अतिवेगाने वाहन चालविणे हे या अपघातांचे प्रमुख कारण आहे. नवीन मोटार वाहन कायद्यात दंडात वाढ झाली असली तरीही लोक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याने जास्त दंड हा प्रतिबंधक नाही.
१ जूनपासून सार्वजनिक बांधकाम खात्याने बसविलेले कृत्रिम बुद्धिमत्ता वापरलेले कॅमेरे कार्यान्वित होणार आहेत. स्पीड रडारच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देताना ते म्हणाले की हा हाय डेफिनिशन कॅमेरा आहे, जो उच्च सुरक्षा क्रमांक प्लेटवर इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करून दिवसाच्या २०० मीटरपर्यंत आणि रात्रीच्या वेळी १०० मीटरपर्यंत ओव्हर स्पीड वाहनांची स्वयंचलित नंबर प्लेट ओळख करून स्पष्ट व्हिडिओ आणि प्रतिमा स्वयंचलितपणे कॅप्चर करील. त्यांनी पुढे माहिती दिली की वापरकर्ता पोलीस खात्याला प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि जून महिन्यात आगाऊ वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी उपकरणे वापरल्यानंतर काही दिवसात प्रशिक्षणाची दुसरी फेरी दिली जाईल. श्री.गुदिन्हो म्हणाले की, सदर खाते नवीन चिन्हे लावण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि ७० अल्कोमीटर आणि श्वास विश्लेषक खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे .तसेच त्यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
वाहतूक सचिव श्री सुभाष चंद्र आयएएस, वाहतूक संचालक, एसपी (वाहतूक) श्री राजन सातार्डेकर, एसपी उत्तर (वाहतूक), श्री धर्मेश आंगले, डीवायएसपी (वाहतूक) श्री सुदेश नार्वेकर, यावेळी उपस्थित होते.
श्री संजीव तनेजा यांनी लेझरट्रॅकवरील माहिती दिली.
दक्षिण गोव्याचे अतिरिक्त वाहतूक संचालक आणि लीड एजंसीचे अध्यक्ष श्री प्रल्हाद देसाई यांनी आभार मानले.