गोवा खबर:प्रस्तावित टीसीपी सुधारणांचे विधेयक विध्वंसक आणि हानीकारक स्वरूप अधोरेखित करून, गोवा टीएमसीने आज प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा गोव्याच्या पर्यावरण आणि येथील लोकांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तीव्र निषेध केला. ‘एआयटीसी ‘चे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजानो डी’मेलो, गोवा टीएमसी सह- संयोजक समिल वळवईकर आणि ‘एस/एस ‘विभागाचे समन्वयक संतोष मांद्रेकर यांनी पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ‘गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम (सुधारणा) नियम, 2023’ मधील सुधारणांना तीव्र विरोध व्यक्त केला.
भाजप सरकारच्या विध्वंसक धोरणांचा निषेध करताना समिल वळवईकर म्हणाले, “भाजप सरकार गोव्याच्या पर्यावरणाचा अथक ऱ्हास करत आहे आणि तेथील लोकांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करत आहे. भाजप सरकारने सुचवलेली प्रत्येक सुधारणा आणि धोरण भांडवलदारांच्या हितासाठी, गोव्याचे हक्क आणि कल्याणाची अवहेलना करत आहे. ” ते पुढे म्हणाले, “गोवा टीएमसी ,गोव्यातील लोकांसोबत एकजुटीने उभी आहे, त्यांच्या हक्कांच्या लढ्यासाठी आणि गोव्यातील भाजप सरकारच्या कुशासनाचा पर्दाफाश करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
गोव्याच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अपयशावर तीव्र हल्ला करताना, ट्रोजानो डी’मेलो यांनी प्रस्तावित टीसीपी सुधारणांच्या हानिकारक प्रभावावर भर दिला. ते म्हणाले, “सध्या चालू असलेल्या म्हादई प्रकरणामध्ये अनेक भागधारकांचा समावेश आहे, मात्र हे अधोरेखित करणे आवश्यक आहे की ‘टीसीपी’ विभाग पूर्णपणे गोवा सरकारच्या अखत्यारीत येतो. तथापि, म्हादई समस्येचे निराकरण करण्यापूर्वी, टीसीपी सुधारणांमध्ये गोव्याचा नाजूक पर्यावरणीय समतोल विनाश घडवून आणण्याची क्षमता आहे. हा अदूरदर्शी दृष्टिकोन आपले पर्यावरण, जैवविविधता, परिसंस्था आणि शेतजमीन धोक्यात आणतो.” त्यांनी पुढे जोर दिला, “गोवा टीएमसी ठामपणे सांगते, की आम्ही म्हादई सारखी दुसरी आपत्ती घेऊ शकत नाही, विशेषत: स्वत: हुन ओढवलेली . प्रस्तावित टीसीपी सुधारणा गोव्याच्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना कमकुवत करतात आणि आमच्या भूमीचे, नैसर्गिक वारशाचे, आणि हवामान बदलाची कधीही भरून न येणारे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण करून . आव्हाने वाढवू शकतात .”
प्रस्तावित दुरुस्त्यांमधील त्रुटींकडे लक्ष वेधून, डी’मेलो यांनी निदर्शनास आणून दिले, “आम्ही आपल्यावर आणखी संकटे येण्याची वाट पाहू शकत नाही; प्रस्तावित सुधारणांनी गोव्यातील विनाशाचे दरवाजे उघडले आहेत.” ते पुढे म्हणाले, “या सुधारणा प्रामुख्याने भांडवलदार आणि श्रीमंत गुंतवणूकदारांच्या हिताची सेवा करतात. ए-१ आणि ए-२ झोनमध्ये मोठ्या आणि उंच इमारतींच्या बांधकामास परवानगी देऊन, “फार्महाऊस” साठी जमीन वाटप करून आणि शेतीचे रूपांतर करून हॉटेल/रिसॉर्ट्सच्या विकासासाठी गरजेच्या आवश्यकता कमी करून, अकृषिक कारणांसाठी जमीन रूपांतर , या सुधारणांमुळे राज्यात अपरिहार्यपणे गर्दी वाढेल आणि महत्त्वाच्या शेती कामांसाठी उपलब्ध जमीन कमी होईल, ज्यामुळे गोव्याच्या अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम होईल.”
पर्यावरणवाद्यांना पक्षाच्या अटळ पाठिंब्याचा दुजोरा देताना, वळवईकर म्हणाले, “आम्ही पर्यावरणवाद्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, जे गोव्याचे पर्यावरण आणि त्यातील अमूल्य संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी अथक प्रयत्न करतात. गोवा टीएमसी त्यांच्याशी सहयोग करण्याच्या आणि या हानिकारक सुधारणांना विरोध करण्याच्या वचनबद्धतेत दृढ आहे. आमच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शांततापूर्ण आंदोलनासाठी, आणि टीसीपी दुरुस्तीच्या विध्वंसक परिणामांचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत.”
गोवा टीएमसीने, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने हस्तक्षेप करून प्रस्तावित टीसीपी सुधारणा रद्द करण्याची मागणी केली आहे. सरकारने जबाबदार प्रशासन असल्याचे दाखवून आपले पर्यावरण, शेतजमिनी आणि गोव्याचे भवितव्य सुरक्षित ठेवण्याची वेळ आली आहे