गोवा खबर: आत्ममग्नता (ऑटिझम) या आरोग्य समस्येबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाने राज्यभरातील सर्व विशेष शाळांमध्ये ऑटिझम जागरूकता सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यशाळा, जनजागृती मोहीम आणि स्पर्धा यासह विविध कार्यक्रमांचा समावेश होता.
“आत्मग्नता (ऑटिझम) जागरुकता सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांना राज्यभरातील विविध शाळांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे आत्ममग्नता या समस्येबाबत जागरुकता वाढविण्यात मदत झाली. ऑटिझमग्रस्त व्यक्तींना समाजामध्ये कशा प्रकारे सामावून घेण्याची गरज आहे याबाबत सर्वसामान्यांमध्ये जाणिवनिर्मिती करण्यास या सप्ताहाची चांगलीच मदत झाली. दिव्यांगजन व्यक्तींना समाजामध्ये सामवून घेत त्यांच्या विकासाला पोषक वातावरण निर्मिती करण्याच्या उद्देशाने आम्ही अशा प्रकारचे विविध उपक्रम भविष्यातही राबवण्याचे नियोजन करत आहोत,” अशी माहिती गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त श्री. गुरुप्रसाद पावसकर यांनी दिली.
ऑटिझम जागृतीसाठी पाठबळ दर्शवण्याच्या उद्देशाने या सप्ताहानिमित्त काही शाळांना निळ्या रंगाने सजवण्यात आले होते. ऑटिझम जागृतीसाठी निळा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जाणारा रंग आहे. या सप्ताहादरम्यान आयोजित स्पर्धांमध्ये डिचोली येथील केशव सेवा साधना ही शाळा विजेती ठरली. पणजीतील विशेष मुलांसाठीचे दिशा स्कूलला दुसरे तर पर्वरी येथील आस्थाचे आनंद निकेतनला तिसरे स्थान लाभले. मडगाव येथील गुजराती समाज शैक्षणिक ट्रस्टची दिव्यांग मुलांची शाळा, केपे येथील लोकविश्वास प्रतिष्ठान विद्यालय आणि मोले येथील लोकविश्वास प्रतिष्ठान विद्यालय या शाळानींही या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
या सप्ताहानिमित्त आत्ममग्नतेच्या समस्येने ग्रस्त असलेल्या मुलांच्या पालकांमध्ये या समस्येमागची कारणे, या समस्येचे व्यवस्थापन आणि अशा मुलांची घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एका कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते.