गोवा खबर

केजरीवाल मॉडेल’ हे भारतातील शासनाचे भविष्य: आप

Published

on

Spread the love
गोवा खबर:आम आदमी पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आप गोवाचे प्रभारी दीपक सिंगला यांनी आप समर्थक आणि स्वयंसेवकांचे आभार मानले. इतक्या कमी कालावधीत राष्ट्रीय दर्जा मिळणे, भारतातील शासनाचे भविष्य ‘केजरीवाल मॉडेलच’ असल्याचे सिध्द करते, असे सिंगला म्हणाले. 
‘आप’ने दिल्लीत तीन वेळा तर गतवर्षी पंजाबमध्ये सरकार स्थापन केले आहे. गुजरात आणि गोवा सारख्या राज्यांनी ‘आप’ला प्रचंड पाठिंबा दिला आहे. आप नेते यांची मेहनत आणि लोकांना ‘केजरीवाल मॉडेल’ यावर असलेला विश्वास, यामुळेच इतक्या कमी कालावधीत ‘आप’ ने राष्ट्रीय दर्जा प्राप्त केला, असे त्यांनी म्हटले.
आपचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर म्हणाले, “राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी आपला रोकण्याचे सर्व प्रयत्न करूनही, ‘आप’ने देशात सकारात्मक राजकारण आणले आहे. राष्ट्रीय दर्जा मिळाल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. राज्यातील लोकांना चांगले भविष्य देण्यासाठी आम्ही आता आमच्या पक्षाला मजबूत करण्यावर भर देणार आहोत. ‘आप’ने सामान्यांचे मुद्दे वारंवार मांडले आहे. आप जनसेवेसाठी आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी आप सदैव प्रयत्न करत राहील”.
आप आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस म्हणाले, “आप हा देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे ज्याने इतक्या कमी कालावधीत आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. या व्यतिरिक्त, सामान्य लोकांना 24 तास वीज आणि पाणी यासारख्या मूलभूत गरजा पुरवण्याचे कामही केले आहे. जे भाजप आणि काँग्रेस सारख्या प्रमुख राष्ट्रीय पक्षांना दीर्घकाळ सत्तेत असूनही जमले नाही. भारताच्या उज्वल भविष्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे केजरीवाल यांचे मॉडेल असून आज हे मॉडेल विलक्षण शासन मॉडेल बनले आहे”.
‘आप’चे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले की, आपची स्थापना झाली तेव्हा अनेकांना आपचा एकही आमदार असेल यावर विश्वास बसत नव्हता. आज आप हा राष्ट्रीय पक्ष बनला आहे. गोव्यात ‘आप’च्या स्थापनेदरम्यान आमच्याकडे काहीच नव्हते. सुरुवातीला, आप युथ विंगने कार वॉशिंग कार्यक्रमाद्वारे निधी उभारला. ‘आप’ने केवळ भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न पाहिले नाही तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कामही केले आहे.
यावेळी पत्रकार पऱिषदेत आपचे उपाध्यक्ष ॲड. सुरेल तिळवे यांच्यासह आप सह प्रभारी चेतन रावल उपस्थित होते.

Trending

Exit mobile version