गोवा खबर

महिलांची फुटबॉल क्षेत्रात लक्षणीय प्रगती: शंखवाळकर

Published

on

Spread the love

गोवा खबर: देशात व राज्यात मागील दोन दशकांत महिलांच्या फुटबॉल क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. महिलांचा फुटबॉलकडे ओढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, असे गोवा फुटबॉल विकास परिषदेचे अध्यक्ष ब्रह्मानंद शंखवाळकर यांनी सांगितले.

पोर्ताईस स्पोर्टिंग क्लबने जीएफडीसीच्या सहकार्याने करमळी पंचायत मैदानावर शनिवारी आयोजित केलेल्या महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जीझस अँड मेरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर लविता फातिमा फर्नांडिस या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ब्रह्मानंद शंखवाळकर सन्माननीय अतिथी म्हणून हजर होते. याव्यतिरिक्त करमळीच्या उपसरपंच रेश्मा मुरगावकर, पंच सदस्य तियोफ्लिना फातिमा कार्दोज, जीएफडीसी केंद्र व्यवस्थापक एलिझाबेथ लोबो, अध्यक्ष रायन कार्दोज व सल्लागार समितीतील लेनिता परेरा यांची उपस्थिती होती.
महिला दिन साजरा करण्याव्यतिरिक्त ज्युनियर महिलांचा तसेच सीनियर महिलांचा असे दोन प्रदर्शनीय सामने खेळविण्यात आले. ज्युनियर सामन्यात जीएफडीसी मयेने बाजी मारली तर सीनियर सामन्यात पोर्ताईस स्पोर्टिंग क्लबने केळबाई स्पोर्टस् क्लबला 2-0 असे नमविले. स्टार खेळाडूंचा पुरस्कार मये केंद्राच्या अनुष्का गुप्ता हिला ज्युनियर विभागात तर सुजिता मुरगावकर हिला सीनियर विभागातील सामन्यासाठी देण्यात आला.


तन्वी टिपू वरगावकर (अ‍ॅथलेटिक्स) व सिडोनिया दा कुन्हा (बुद्धिबळ) या महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना जीएफडीसी अध्यक्ष शंखवाळकर यांनी गोव्यात झालेल्या महिलांच्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा उल्लेख करताना या स्पर्धेमुळे महिलांना खूप फायदा झाल्याचे सांगितले. या स्पर्धेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे अधिकाधिक महिला या खेळाकडे वळत आहेत.

दोन प्रदर्शनीय सामन्यांत खेळलेल्या काही खेळाडूंनी उत्तम खेळ दाखवला. आपले फुटबॉल कौशल्य त्यांनी दाखवून दिले. महिलांमध्ये फुटबॉल खेळासाठी आवश्यक कौशल्य आहे. त्यांनी कधीही हार न मानता केवळ मेहनत करून आपल्या कौशल्यवृद्धीकडे लक्ष देताना दर्जेदार प्रशिक्षणाकडे वळण्याची गरज आहे, असे शंखवाळकर म्हणाले. खेेळाबरोबर शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे असून यामुळे खेळातील ज्ञान मिळण्यासही सोपे जाते, असे ते म्हणाले.

या सोहळ्यात स्वेतलाना दा कुन्हा यांनी कोकणी गीत ‘ओस्तोरी’ची सादरीकरण देखील केेले.

अधिकाधिक मुलींनी सहभाग नोंदवावा यासाठी जीएफडीसीतर्फे 8 मार्च ते 25 मार्च या कालावधीत आपल्या विविध केंद्रावर विशेष फुटबॉल स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.

Trending

Exit mobile version