गोवा खबर:गोवा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक विभागातर्फे एप्रिल महिन्यापासून सुरू होणारे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार महाविद्यालयांचे परिक्षा २५ एप्रिल पासून सूरू होत आहेत. परंतु याच वेळी २४ एप्रिल रोजी गोव्यातील प्रसिद्ध श्री देवी लईराईची शिरगाव जत्रा आहे.या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर गोव्यातर्फे गोवा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक श्री अशोक चोडणकर यांच्याकडे त्या दिवसाचा पेपर पूढे नेण्याची मागणी करणारे निवेदन पत्र सादर केले.
लईराई देवीची जत्रा ही गोमंतकातील एक मोठी जत्रा म्हणून ओळखण्यात येते. या देवीचे गोव्यासह अन्य शेजारील राज्यात मिळून हजारो धोंड भक्तगण आहेत.या जत्रेदरम्यान धोंड गोव्यातील गावोगावी कडकपणे व्रत पाळतात. या मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेचा मानसिक ताण होण्याची शक्यता आहे. रात्री जे विद्यार्थी धोंड आहेत ते होमखंड मधून आगीच्या कोळशावर चालतात. ही विधी पहाटेपर्यंत चालू असते. त्यामुळे २५ तारखेला सकाळी जे विद्यार्थी धोंड आहेत, त्यांना परीक्षा द्यायला कठीण होणार. पारंपरिक गोव्याच्या संस्कृतीच्या दृष्टीने शिरगाव जत्रा ही खूप महत्त्वाची आहे. परीक्षेमुळे नवीन पिढीला या सांस्कृतिक विरासतीचा विसर लागता यायला नको.
विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक कडे ही समस्या मांडली. तसेच अंतिम वर्ष गणित विद्यार्थ्यांचे पेपर 120 गुणांचे व तीस तासांचे असतात. यामुळे दररोज परीक्षा देणे खूप तणावपूर्ण होते. विद्यार्थ्यांनी अभाविप कडे ही समस्या मांडल्यानंतर अभाविप च्या कार्यकर्त्यांनी ही समस्या देखील परीक्षा नियंत्रकाकडे मांडली व यावर पेपरमध्ये अंतर वाढवण्याची मागणी केली.
परीक्षा नियंत्रक श्री चोडणकर यांनी अभाविप च्या सगळ्या मागण्या मान्य केल्या व लवकरच नवीन वेळ पत्रक जारी करणार असे आश्वासन दिले. निवेदन सादर करताना अभाविपचे उत्तर गोवा संयोजक सुदिप नाईक, सहसंयोजक उत्तम पार्सेकर, साहिल महाजन, राज कोरगावकर, सर्वेश तलवडकर, रुद्रेश नाईक, नीरज शेट्ये आदी कार्यकर्ते उपस्थित होते.