गोवा खबर

जीएफडीसीची प्रशिक्षकांसाठीची तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न

Published

on

Spread the love

गोवा खबर: गोवा फुटबॉल विकास परिषदेने (जीएफडीसी) प्रशिक्षकांसाठी दोन्ही तालुक्यात प्रत्येकी एक अशा दोन कार्यशाळाचे यशस्वीरित्या आयोजन केले. सामनासंबिधित प्रशिक्षण सत्रे त्यांना अधिक सुसूत्रबद्धरित्या घेता यावीत यासाठी प्रशिक्षकांचे ज्ञान वाढवून त्यांना अधिक प्रगत करणे हा या कार्यशाळांचा हेतू होता. 23, 24 व 25 मार्च रोजी दक्षिण गोव्यातील केपेमधील बोरीमळ क्रीडा संकुलात तर उत्तर गोव्यातील बांबोळी अ‍ॅथलेटिक स्टेडियममध्ये 28, 29 व 30 मार्च रोजी या कार्यशाळा संपन्न झाल्या. दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत झालेल्या या कार्यशाळांमध्ये राज्यातून सुमारे 75 प्रशिक्षक सहभागी झाले होते.

जीएफडीसीचे अध्यक्ष ब्रह्मानंद शंखवाळकर व सदस्य सचिव दीपेश प्रियोळकर यांनी उत्तर गोव्यातील कार्यशाळेला भेट दिली. जीएफडीसीचे तांत्रिक साहायक लवज्यो गोम्स यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही कार्यशाळा झाल्या.

‘पणजीतील डॉन बॉस्को येथे गोवा क्रीडा प्राधिकरणाने आयोजित केएनव्हीबी कार्यशाळेत मी व माझ्या सहकार्‍यांनी मिळविलेले ज्ञान जीएफडीसी प्रशिक्षकांपर्यंत पोहोचावे हा या कार्यशाळा आयोजनामागील मुख्य उद्देश होता, असे ते म्हणाले.

‘गोम्स पुढे म्हणाले की, जीएफडीसी केंद्रांतील प्रशिक्षणार्थींच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे प्रशिक्षकांना रिक्त ठेवण्यापेक्षा आमच्याकडील ‘डच फिलोसॉफी’ संबंधीचे ज्ञान त्यांच्याकडे पोहोचवण्यासाठी जीएफडीसीने सदर कार्यशाळा आयोजनाचा निर्णय घेतला होता.

या कार्यशाळेत प्रात्यक्षिके व लेखी सत्रे ही जीएफडीसीचा वयोगटापर्यंत (6 ते 14 वर्षे) मर्यादित होती. मुलांमधील वैशिष्ट्ये व प्रशिक्षकांची भूमिका यासंबंधी लेखीमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. प्रात्यक्षिकांमध्ये फुटबॉलमधील चार प्रकारच्या प्रमुख हालचाली ज्यामध्ये बचावात्मक, आक्रमकता, बचावातून आक्रमकडेकडे स्थित्यंतर, आक्रमकतेकडून बचावाकडे स्थित्यंतर याद्वारे 2 वि. 1, 2 वि. 2, 3 वि. 2, 3 वि. 3 व 4 वि. 4 या रणनीतींचा अभ्यास करण्यात आला, असे गोम्स म्हणाले.

जीवनातील मूल्यांचा जसे निर्णयक्षमता, संवाद, संयोजन आदींचा फुटबॉलमध्ये कसा वापर करावा, आदी ज्ञान प्रशिक्षकांना या कार्यशाळांच्या माध्यमातून देण्यात आले, असे गोम्स म्हणाले.

या कार्यशाळांच्या माध्यमांतून सहभागी प्रशिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत करत भरपूर माहिती प्राप्त केली.

Trending

Exit mobile version