गोवा खबर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत जी२०च्या तयारीबाबत आढावा बैठक

Published

on

Spread the love

 

  • तयारीचा आढावा घेण्यासाठी जी२०चे प्रतिनिधी मंडळ गोव्यात
  • जी२०च्या आगामी बैठकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जी२० परिषदेचे प्रतिनिधी मंडळ भेटले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना
  • जी२०च्या गोव्यातील बैठकांची तयारी योग्य मार्गावर

 

गोवा खबर: जी-२० परिषदेसाठीचे मुख्य समन्वयक हर्ष वर्धन शृंगला, भारतीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव अरविंद सिंह आणि इतर प्रतिनिधींनी सोमवारी २० मार्च रोजी पर्वरी येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन एप्रिल महिन्यात नियोजित जी-२० बैठकांच्या तयारीचा आढावा घेत चर्चा केली.

परिषदेच्या तयारीबाबत राज्यातील पूर्वतयारी कामांचा आढावा घेण्यासाठी जी-२० परिषद प्रतिनिधी मंडळ शासकीय भेटीवर गोव्यात दाखल झाले.जी-२० परिषदेअंतर्गत गोव्यामध्ये आठ बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. यामध्ये दोन मंत्रीस्तरीय तसेच ६ इतर बैठकांचे आयोजन राज्यात आगामी चार महिन्यांत केले जाणार आहे. यातील पहिली बैठक आंतरराष्ट्रीय आरोग्य अधिकारी व प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे.

१७ ते १९ एप्रिल दरम्यान आरोग्य क्षेत्रातील कार्यगटाची दुसरी बैठक बांबोळी-गोवा येथील ग्रँड हयातमध्ये होणार आहे. तर विकास कार्यक्षेत्राबाबत तिसरी बैठक ९ व १० मे रोजी गोव्यात होणार असून या बैठकीचे आयोजन स्थळ आगामी काही दिवसांत निश्चित केले जाणार आहे.

जून महिन्यांत तीन बैठकांचे आयोजन होणार आहे. या टप्प्याची सुरवात आतंरराष्ट्रीय वित्त रचना कार्यगटाची तसरी बैठक ५ ते ७ जून दरम्यान होणार आहे. तर १२ ते १४ जून दरम्यान गोव्यात एसएआय२० परिषद होणार आहे.

पर्यटन मंत्री स्तरीय बैठक व त्यानंतर पर्यटन क्षेत्र कार्यगटाची चौथी बैठक १९ ते २२ जून दरम्यान होणार आहे.त्यानंतर जुलैमध्ये ऊर्जा क्षेत्राच्या कार्यगटाची बैठक होणार आहे. त्यानंतर ऊर्जा मंत्री गटाची दुसरी बैठक होणार आहे.

आज झालेल्या आढावा बैठकीस गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह जी२० परिषद आयोजन समितीचे मुख्य समन्वयक हर्ष वर्धन शृंगला, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव अरविंद सिंह हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोव्यातील बैठकांच्या तयारीचा आढावा घेतला.

हे प्रतिनिधी मंडळ गोव्यातील विविध परिषदांना उपस्थिती लावणार आहे, तसेच आग्वाद किल्ला, सेंट कॅथेड्रल व इतर महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांनाही भेट देणार आहे. तसेच संवाद, रात्री भोज उपक्रमाअंतर्गत गोव्यातील संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांनाही हे प्रतिनिधी मंडळ भेट देणार आहे.

 

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुनर्वापर व पुनःप्रक्रिया करून बनवलेल्या उत्पादनांच्या सादरीकरणातून शाश्वत विकास या संकल्पनेचे महत्व व प्रसार करण्याचा मुद्दा मांडला. जी-२० बैठकांसाठी येणाऱ्या प्रतिनिधींसाठी गोव्यातील क्रूझ पर्यटनाचा प्रसार करण्यासाठी मेजवानी उपक्रम आयोजित करण्यासाठी या प्रतिनिधी मंडळाने इच्छा व्यक्त केली.

गोव्यातील बैठकांच्या तयारीचा भाग म्हणून गोमंतकीय संस्कृती, वारसा आणि शाश्वत पर्यटनाचा प्रसार करणाऱ्या उपक्रमांचा समावेश करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Trending

Exit mobile version