गोवा खबर: गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने गोमंतकीय जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, गुढी पाडवा हा हिंदुंचा महत्त्वाचा पारंपरिक सण मानला जातो. आपल्या देशाच्या विविध राज्यांमध्ये व विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतींनी किंवा विविध प्रकारच्या विधींनी हा सण साजरा केला जातो व तो विविध नावांनी ओळखला जातो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे तो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. हा एक शुभ दिन मानला जातो व या दिवसापासून नवीन वर्ष सुरू होते.
भारताला विविधतेतील एकतेचा समृद्ध व विलक्षण वारसा लाभलेला आहे. म्हणूनच, आपले वैयक्तिक व सामाजिक जीवन सुधारण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्ये व सद्गुण यांचा प्रसार करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणतात.
सर्व लोकांमधील एकता व मैत्री बळकट करण्याबरोबरच, यंदाचा गुढी पाडव्याचा सण सर्वांच्या आयुष्यात सुख व समृद्धी घेऊन येईल, अशी मी आशा करतो, असे ते शेवटी म्हणतात.