गोवा खबर:गोवा सरकारच्या पशुसंवर्धन खात्यातर्फे स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत मोले, कुळे आणि साकोर्डा पंचायत क्षेत्रातील शेतकर्यांकरिता विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. केतन चौगुले, पशुवैद्यकीय अधिकारी आणि श्री. प्रदीप नाईक विस्तारीत अधिकारी यांनी पशुसंवर्धन खात्यातर्फे राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती दिली. अधिकाधिक शेतकर्यांनी सरकारी योजनांचा फायदा घेऊन शेती व्यवसायाकडे वळविण्याच्या उद्देशाने सदर मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
मोले पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला स्थानिक सरपंच श्री. कपिल नाईक व इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. नाईक यांनी ग्रामस्थांना सरकारी योजनांचा फायदा घेऊन स्वावलंबी बनण्याची विनंती केली.
कुळे पंचायत सभागृहात आयोजित मेळाव्याला स्थानिक सरपंच गोविंद शिगांवकर व अन्य पंच उपस्थित होते. साकोर्डा पंचायत क्षेत्रात घेण्यात आलेल्या मेळाव्याला पंचायत सचिव श्री. भूषण तावडे यांनी मार्गदर्शन केले.
संबंधित ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात डॉ. केतन चौगुले यांनी अधिकाधिक युवक शेती व्यवसायाकडे वळावे यासाठी अथक मेहनत घेतली.