गोवा खबर: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, राजभवन (दरबार हॉल) येथे आयोजित, सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
राज्यपालांनी सशस्त्र दलांच्या योगदानाचे कौतुक केले. सशस्त्र दलांच्या, राष्ट्रसेवेतील अतुलनीय धैर्याला सलाम करताना राज्यपालांनी सांगितले की, सशस्त्र दल उदात्तपणे कार्य करते. त्यामुळे आपण त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, की भारत हा सर्वात वेगाने विकसित होणारा देश आहे. आम्ही अभिमानाने सांगू शकतो, की जगभरातील लोकांच्या शांती आणि समृद्धीसाठी आम्ही भारत देशाला विश्वगुरू बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. राष्ट्रीय संकट आणि आपत्तीच्या काळात, सशस्त्र दलांनी दिलेल्या सेवांचेही राज्यपालांनी कौतुक केले.
जलस्रोत मंत्री, श्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले की, आपली सशस्त्र सेना देशाच्या सीमेवर जागृत असल्यामुळेच आपण शांतपणे झोपू शकतो. त्यांचे शौर्य आपल्या अंतःकरणात, सदैव प्रेरणास्रोत म्हणून राहिले पाहिजे.
याप्रसंगी, सैनिक कल्याण विभागाच्या सचिवांनी सशस्त्र सेना ध्वज दिनाचे स्टिकर, गोव्याचे राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई, जलस्रोत मंत्री श्री. सुभाष शिरोडकर आणि मुख्य सचिव श्री. पुनीत कुमार गोयल, आय.ए.एस. यांना दिले.
उच्च शिक्षण संचालनालय, महिला व बाल विकास संचालनालय आणि उत्पादन शुल्क आयुक्त यांना, सैनिक कल्याणासाठी सर्वाधिक निधी जमा केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी समिक्षा भोबे काकोडकर यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणारे गीत सादर केले.