क्रीडा खबर

केरळविरुद्ध तीन गुणांशिवाय मला काहीही नको आहे; अल्वारो वाझक्वेझ

Published

on

Spread the love

 

 गोवा खबर: हीरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पुढील लढतीमध्ये केरळ ब्लास्टर्स एफसी विरुद्ध कोची येथे मला तीन गुणांशिवाय काहीही नको आहे, असे एफसी गोवाचा स्टार फुटबॉलपटू अल्वारो वाझक्वेझ याने म्हटले आहे.

 

रविवार, 13 नोव्हेंबर हा दिवस एफसी गोवाचा फॉरवर्ड वाझक्वेझसाठी एक खास दिवस आहे प्रसंग आहे. त्याचा मागील क्लब केरळ ब्लास्टर्सविरुद्ध प्रथमच मैदानात उतरणार आहे. केरळ ब्लास्टर्सला त्यांच्या सहा मोसमात त्यांच्या पहिल्या फायनलमध्ये पोहोचवणारा स्पेनचा वाझक्वेझ त्यावेळी हिरो ठरला होता. मात्र, आता त्यांच्या विरुद्ध खेळताना नवा क्लब एफसी गोवाविरुद्ध त्याने विजय मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. केरळमध्ये मिळालेल्या प्रेमाबद्दल तो कृतज्ञ असताना, वाझक्वेझला त्याच्या पूर्वीच्या क्लबबद्दलचा आदर नव्या क्लबसाठी चुकीचा ठरू नये, असे त्याला वाटते. “ब्लास्टर्सचे चाहते उत्तम आहेत. परंतु, एकदा खेळ सुरू झाला की उद्दिष्ट नेहमी सारखेच असते – तीन गुण मिळविण्यासाठी,”  असे 31 वर्षीय अल्वारो याने सांगितले.

 

“मला त्या सर्वांना भेटून आनंद झाला. केरळ ब्लास्टर्सच्या चाहत्यांचे प्रेम आणि समर्थन मला नेहमीच लाभले आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानण्याची ही माझ्यासाठी संधी आहे. मात्र, हे फुटबॉल आहे, नाही का? कधीकधी आपण स्वतंत्र मार्गाने जातो. आणि आता एफसी गोवाचा खेळाडू म्हणून माझ्या संघासाठी सर्वोत्तम खेळ करण्याचा माझा उद्देश आहे, असे वाझक्वेझ याने केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटले.

दुखापतीनंतर पूर्णपणे तंदुरुस्त

दुखापत हा खेळाचा एक भाग आहे. त्यातून कुणीही सुटलेला नाही. त्रासदायक दुखापतीमुळे हा वक्तृत्ववान फॉरवर्डही निराश झाला आहे. यंदाच्या हंगामात दोन सामने खेळताना जवळपास 100 मिनिटे तो मैदानावर होता. मात्र त्याला अद्याप अपेक्षित खेळ करता आलेला नाही. त्यातच चेन्नईयिन एफसी आणि जमशेदपूर एफसी विरुद्धच्या सामन्यांना त्याला मुकावे लागले. एफसी गोवाने त्यांच्या पहिल्या 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि स्पॅनियार्डचा फारसा प्रभाव पडला नाही. परंतु, त्याच्या आधीच्या क्लबविरुद्ध वाझक्वेझ हा दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास त्याच्या गोव्यातील सहकार्‍यांना वाटतो. कारण केरळला हरवून ते आयएसएलच्या अव्वल स्थानी झेप घेण्यास उत्सुक आहेत.

 

“दुसर्‍या गेमपूर्वी माझ्या हॅमस्ट्रिंग दुखापतीने पुन्हा डोके वर काढले. त्यातून पूर्णपणे सावरलेलो आहे. तसेच पूर्णपणे तंदुरुस्त आहे. मला एफसी गोवासाठी सर्वोत्तम सुरुवात करता आलेली नाही. पण चांगल्या कामगिरीसाठी मी येथे आलो आहे आणि मी तयार आहे,” असे हा स्ट्रायकर म्हणाला.

 

कोची येथे होणाऱ्या केरळविरुद्धच्या सामन्यात वाझक्वेझ आणि सहकार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी एफसी गोवाचे जवळपास 200 फॅन्स येणार आहेत.  स्पेनच्या 20 वर्षांखालील संघातील माजी खेळाडूने त्याला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. “सर्वप्रथम,  टूरसाठी आणि स्टेडियममध्ये आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार. दुसरे म्हणजे, आम्हाला त्यांना आणखी एक विजय मिळवून द्यायचा आहे आणि सर्वोच्च सन्मानासाठी लढा चालू ठेवायचा आहे, असे वाझक्वेझ याने पुढे म्हटले.

 

Trending

Exit mobile version