गोवा खबर

बेकायदेशीरपणे मोठ्या जमिनींचे रूपांतर मायकल लोबोंचे “काम” दर्शविते :अमित पाटकर

Published

on

Spread the love
 गोवा खबर : बेकायदेशीरपणे रूपांतरित झालेल्या असंख्य जमिनी ज्या आता नगर नियोजन खात्याने पुन्हा मूळ स्थितीत आणल्या आहेत त्या आमदार मायकल लोबोंचे कार्य दर्शवितात. मायकल लोबोंनी  महात्मा गांधींना फक्त चलनी नोटांवर पाहिले आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे राष्ट्रउभारणीत योगदान समजून घेण्यासाठी लोबोनी पुस्तके वाचण्याची गरज आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा भारताच्या एकात्मतेसाठी  असल्याचे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
कळंगुटचे आमदार मायकल लोबोनी  राहुल गांधींच्या “भारत जोडो यात्रे” सबंधी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना, अमित पाटकर यांनी लोबोंवर पलटवार केला आहे. मायकल लोबोनी लोकांची कामे करण्याच्या नावाखाली वैयक्तिक फायद्यासाठी जमीन रुपांतरासारखी बेकायदेशीर कामे केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षांनी केला.
गोव्यातील भाजप सरकारने जनतेचा जनादेश चोरला हे मायकल लोबोनी लक्षात घ्यावे. गोमंतकीयांनी  काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत दिलेल्या मतांवर  भाजपने दिवसाढवळ्या डरोडा घातला. भाजपला ६७ टक्के लोकांची मते मिळाली नाहीत, असे अमित पाटकर यांनी निदर्शनास आणून दिले.
जर मायकल लोबोना त्यांच्या तथाकथित कामांच्या आधारावर व  स्वबळावर मते मिळवता आली असती तर मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नीने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक का लढवली? त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक का लढवली नाही? राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवण्याची हिंमत त्यांनी का दाखवली नाही? असा सवाल अमित पाटकर यांनी केला.
मायकल लोबोनी केवळ लोकांच्या जनादेशाचाच विश्वासघात केला नाही तर देवाचा अवमान केला आहे. मायकल लोबो पापांच्या प्रचंड ओझ्याखाली दबलेले आहेत. ते हताश झाले आहेत आणि त्यांचे सध्याचे राजकीय तारणहार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मनोरंजन करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, असा टोला अमित पाटकर यांनी हांणला आहे.
आमचे नेते राहुल गांधी यांची “भारत जोडो यात्रा” ही भारताला एकसंध करण्यासाठी आहे. बेरोजगारी, महागाई आणि फुटीरतावादी राजकारण यावर राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना भाजपने उत्तर देण्याची गरज आहे. लाखो भारतीय रोज राहुल गांधींसोबत यात्रेत सहभागी होत  आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे, असा दावा अमित पाटकर यांनी केला आहे.

Trending

Exit mobile version