गोवा खबर:पर्यावरण मंत्री श्री.निलेश काब्राल यांनी प्रदूषण टाळण्यासाठी बांधकाम मोडतोड व इतर कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी योग्य यंत्रणा शोधण्याच्या गरजेवर भर दिला.
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ साळगाव येथे आयोजित गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ, रिसर्च ट्राँयंगल इन्स्टिट्यूट (RTI), इंडिया, रेझिलिएंट एनर्जी आणि एसआयएनटीईएफ नॉर्वे यांच्या संयुक्त विद्यमाने बांदकाम मोडतोड व इतर कचऱ्याची पर्यावरण पुरक पद्दतीने हाताळणी” या विषयावरील कार्यशाळेत श्री. काब्राल बोलत होते. श्री. काब्राल यांनी पुढे बोलताना सरकार एसआयएनटीईएफ नॉर्वेच्या सहकार्याने म्हापसा येथे बांधकाम मोडतोड व इतर कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे असे सांगितले. राज्यातील बांधकाम मोडतोड व इतर कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्यात प्रस्तावित प्रक्रिया प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल असे ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री श्री. काब्राल यांनी सार्वजनिक बांधकाम खाते बांधकाम कचऱ्याच्या धोक्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना आणि योग्य विल्हेवाट लावण्याचे तंत्र त्याच्या बांधकाम कार्यामध्ये लागू करेल अशी घोषणा केली.
भारतातील नॉर्वेचे कौन्सुलेट जनरल श्री. अर्ने जॅन फ्लोलो यांनी आपल्या भाषणात राज्यातील बांधकाम मोडतोड व इतर कचऱ्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने हाताळणीसाठी नॉर्वेजियन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे कौतुक केले. एसआयएनटीईएफचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ख्रिश्चन जे. एंगेल्सन यांनी बांधकाम मोडतोड व इतर कचरा हाताळणी, पुनर्वापर आणि वैज्ञानिक व्यवस्थापनाविषयी विविध पैलूंची माहिती दिली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन खात्याचे सचिव श्री. रमेश वर्मा, आयएएस यांनी बांधकाम मोडतोड आणि इतर कचरा हाताळण्यासाठी सर्वांगीण दृष्टीकोन असणे आवश्यक आहे असे सांगितले. पूर्वीचे लोक या कचऱ्याला वेगळा कचरा मानत नव्हते, त्यामुळे या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जात नव्हती. आता बरीच जागरूकता आली आहे आणि आपण सर्व भागधारकांच्या सहभागासह प्रत्येक पैलू समजून घेणे आणि राज्यातील या बांधकाम मोडतोड व इतर कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांनी या विषयावरील चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या संघाचे कौतुक करताना खाण कचऱ्याचे बांधकामासाठी विटांमध्ये पुनर्वापर करण्याच्या कल्पनेचा शोध घेण्यावर भर दिला.
गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लेव्हिन्सन मार्टिन्स यांनी स्वागत केले. आरटीआय संचालक डॉ. गौरव भटियानी यांनी आभार मानले.