गोवा खबर

गोव्याच्या पर्यटन स्टॉलला उदंड प्रतिसाद

Published

on

Spread the love
– अमृतसर येथील ट्रॅव्हल मार्टचे थाटात उद्घाटन
गोवा खबर:गोवा पर्यटन खात्याच्यावतीने पंजाब राज्यातील अमृतसर येथे आयोजित इंडिया ट्रॅव्हल मार्ट मध्ये सहभाग घेतला आहे. याठिकाणी पर्यटन खात्याकडून उभारण्यात आलेल्या स्टॉलला पर्यटन उद्योगातील व्यावसायिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. या ट्रॅव्हल मार्ट मध्ये गोव्यासह राजस्थान, केरळ, गुजरात आणि देशातील इतर राज्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. मार्टच्या उद्घाटना दिवशीच पर्यटन व्यवसायातील टूर्स अँड ट्रॅव्हल एजंट्स तसेच उच्च श्रेणीतील पर्यटकांकडून चौकशी करण्यात येत होती.
या मार्ट चे उद्घाटन अमृतसरचे महापौर करमजीत सिंग रिंटू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर रिंटू यांनी गोव्याच्या विभागास भेट दिली. गोव्याच्या स्टॉल वर पर्यटन खात्याचे उपसंचालक धीरज वागळे, सहाय्यक संचालक गजानन महाले, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे विपणन व्यवस्थापक हरीश साटेलकर उपस्थित होते. यावेळी महापौर रिंटू यांचे पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. गोव्यात अभिनव पद्धतीने पर्यटन सेवा आणि सुविधांची माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल महापौरांनी कौतुक केले.
९ ऑक्टोबर पर्यंत सकाळी ११ ते   सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुल्या असणाऱ्या या मार्ट मध्ये गोवा पर्यटन खात्याने ई – बायकिंग ट्रॅक, होम स्टे संस्कृती, राज्यातील ग्रामीण भागातील पर्यटन तसेच पर्यावरणीय पर्यटन यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Trending

Exit mobile version