गोवा खबर:ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांची सत्ता हे लोकशाहीचे मुख्य तत्व आहे. मडगाव नगराध्यक्ष निवडीसाठी राज्य सरकारने काढलेला अध्यादेश कायद्याला धरुनच आहे, असा पलटवार मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी विरोधकांवर केला.
भाजपाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे सरचिटणीस तथा माजी खासदार नरेंद्र सावईकर आणि माजी आमदार दामू नाईक उपस्थित होते.
गोवा महानगर पालिका आणि नगर पालिका कायद्यात गुप्त मतदान घेण्याविषयी कोणतीही तरतूद नाही. नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास ठराव आल्यास विशेष बैठक बोलावण्याची तरतूद आहे. पण मतदान गुप्त पद्धतीने घेण्याचा उल्लेख नाही. ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्यांचाच नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष किंवा सरपंच आणि उपसरपंच होतो, असे कामत म्हणाले. विरोधक लोकांची दिशाभूल करत आहेत. नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष यांची निवड मतदान पद्धतीने आणि एकमताने घेणे आवश्यक आहे. मग ते गुप्त असो किंवा हात उंचावून असो. या दोन्ही पद्धतीस कायद्याचा आधार आहे. असे असताना विरोधक विनाकारण आदळआपट करत असल्याचे कामत म्हणाले.
सरकारने अध्यादेश काढून योग्य काम केले आहे. कारण यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अधिक बळकट होतील. तसेच कामकाजही सुधारेल, असा विश्वास यावेळी कामत यांनी व्यक्त केला. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. यामुळे आम्ही घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या सदस्यांनी आमच्या उमेदवारालाच मतदान करावे, असे अपेक्षित असणे स्वाभाविक आहे. मग गुप्त मतदान करण्याची गरजच काय, असा सवालही कामत यांनी केला.
यावेळी बोलताना दामू नाईक म्हणाले की, राज्य सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे. तसेच काही स्वंयघोषित विरोधी पक्षनेते सरकारवर आगपाखड करत आहेत. काही ना काही कारणाने माध्यमांतून झळकण्याची त्यांची धडपड सुरू आहे. यामुळे ते सरकारवर बेछूट आरोप करत आहेत. पण सरकार करत असलेली कामे जनतेसमोर आहेत. सर्वत्र आर्थिक मंदीची चाहूल असतानाही सरकार विकासकामे झपाट्याने करत आहे. तसेच बेकायदेशीर आणि अवैध कामांवर कारवाई करत आहे. राज्यात देशद्रोही कारवाया करणाऱ्या संस्था किंवा संघटनांना थारा दिला जाणार नाही. अशा संस्था किंवा संघटनांना पैसा पुरवणाऱ्या आणि त्यांना आसरा देणाऱ्या प्रत्येकाची चौकशी होईल, असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला.
विरोधी आमदार विजय सरदेसाई यांना सध्या राजकीय नैराश्य आले आहे. त्यामुळे त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच अमली पदार्थ यावरून सरकारवर टीका केली. प्रत्यक्षात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असून अमली पदार्थ असो किंवा कोणतेही बेकायदा अथवा अवैध कृत्य असो सरकार धडक कारवाई करत असल्याचे नाईक म्हणाले.