गोवा खबर:भारतीय निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२२ रोजी ज्येष्ठ मतदारांना आदर देण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेतील त्यांच्या सततच्या योगदानाची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा केला. मुख्य निवडणूक आयुक्त श्री राजीव कुमार यांनी ८० वर्षावरील मतदारांचा सत्कार केला.
गोव्यातील बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या ८० वर्षावरील मतदारांना भेट दिली आणि त्यांना आयोगाचे ज्येष्ठ मतदार पत्रे वितरित केली. निवडणूक नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकार्यांनी गोव्यातील विविध भागातील वयाची शंभर वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांना भेट दिली आणि त्यांचा सत्कार केला आणि त्यांना वरिष्ठ मतदार पत्रे सुपूर्द केली.
मुख्य निवडणूक आयोगाने मतदारांना दिलेल्या आपल्या पत्रात ज्येष्ठ मतदारांचे निवडणूक प्रक्रियेत सतत योगदान दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत आणि ज्येष्ठ मतदारांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी भारतीय लोकशाही बळकट करण्याबरोबरच तरुणांसमोर एक आदर्श ठेवला आहे असे सांगितले.
गोव्यात ८०+ वयोगटातील सुमारे २९००० मतदारांची नोंद आहे, त्यापैकी ३३० मतदार १००+ वयोगटातील आहेत. सत्कार कार्यक्रमास ज्येष्ठ मतदारांकडून चांगला प्रतिसाद लाभला. निवडणूक आयोगाने २०२२ च्या विधानसभा निवडणूकीत ८०+ वर्षावरील मतदारांस पोस्टल बॅलेट सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्येष्ठ मतदारांनी आयोगाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली व भविष्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रियांमध्ये उत्साहाने भाग घेण्याचे उतर दिले.