गोवा खबर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोवा कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोव्याला नवीन कृषी महाविद्यालय

                                                            

 

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कृषी मंत्री श्री रवी नाईक, कुंभारजुवाचे आमदार, श्री राजेश फळदेसाई, कृषी सचिव, श्री अरुण कुमार मिश्रा, आयएएस, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू, प्रा. हरिलाल मेनन, उच्च शिक्षण संचालक, श्री प्रसाद लोलयेकर, आयएएस, कृषी संचालनालयाचे संचालक, श्री नेविल अल्फोन्सो, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण भेंडे, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष, श्री सिद्धेश नाईक, से -ओल्ड गोव्याच्या ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती सँड्रा गोन्साल्विस यांच्या उपस्थितीत जुने गोवा येथे राज्य कृषी व्यवस्थापन आणि विस्तार प्रशिक्षण संस्था, गोवा (SAMETI-Goa) आणि कृषी संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन केले.

 नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत बोलताना डॉ. सावंत यांनी महाविद्यालय सुरळीत चालेल आणि भविष्यातील पदवीधरांना उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी सर्व आवश्यक मान्यता असतील असे आश्वासन दिले. डॉ. सावंत यांनी, महाविद्यालय चांगले चालविण्यासाठी सरकार मदत करण्यात कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना कृषीतज्ञ होण्याचे उद्दिष्ट सांगून महाविद्यालयात कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण सुरू करणार असल्याचे सांगितले.

 डॉ. सावंत यांनी पुढे बोलताना सध्याच्या इमारतीच्या व्यतिरिक्त जिथून वर्ग चालविले जातील, त्या परिसरातील नवीन महाविद्यालयाच्या इमारतीसाठी जागा शोधण्यात आली असून लवकरच इमारत बांधण्यात येईल असे सांगितले. ते पुढे म्हणाले की महाविद्यालय जवळच असलेल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) समन्वयाने महाविद्यालयात कृषी अभ्यासासाठी संशोधन संस्था सुरू करण्यात येणार.

 मुख्यमंत्र्यांनी आंतरपिकांच्या सरावाला आणि अधिकाधिक काजू लागवडीला प्रोत्साहन देण्याची सूचना केली. ते म्हणाले की सरकार अनुदान देत असून ते स्थानिकांकडून उत्पादन खरेदी करीत आहे. स्वयंपूर्णा गोंयसाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे असे ते म्हणाले.

डॉ. सावंत यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि मत्स्यपालन विषयातील पदवी वर्ग सुरू करण्याच्या सरकारच्या योजनांची माहिती दिली.

किसान क्रेडिट कार्ड सुविधा, दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण केंद्रे सुरू करणे, कृषी टाकाऊ वस्तूंचा फलदायी वापर कसा करायचा हे शिकवणारे कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या अनेक उपक्रमांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कृषी मंत्री श्री रवी नाईक यांनी गोव्याला कृषी महाविद्यालय मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि या क्षेत्रात शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्यांना ते सोयीचे होईल असे सांगितले. गोव्यातील यापुढे कोणतीही शेतजमीन कृषीशिवाय इतर कोणत्याही वापरासाठी बदलली जाणार नाही  अशी अपेक्षा श्री.नाईक यांनी व्यक्त करून आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्याचे आपम रक्षण केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

कुंभारजुवाचे आमदार श्री राजेश फळदेसाई यांनी गोमंतकीयांना शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्याबाहेर जावे लागत होते परंतु आता गोव्यात कृषी महाविद्यालय सुरू केल्याने मदत होईल असे सांगितले.

Trending

Exit mobile version