गोवा खबर

सरकार राज्यासाठी साधनसुविधा योजना राबविणार

Published

on

Spread the love

गोवा खबर:राज्यासाठी सर्वसमावेशक साधनसुविधा योजना लागू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे ज्यामुळे राज्यात उत्तम कनेक्टिव्हिटी आणि पर्यावरणपूरक वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण होतील. राज्यासाठी सर्व समावेशक साधनसुविधा योजना आणि पणजी शहरासाठी पार्किंग मास्टर प्लॅन यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोदसावंत यांनी आज बैठक घेतली.

बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी वाहतूक, नदी परिवहन, बंदर, कदंब परिवहन महामंडळ आणि इतर एजन्सी या सर्व संबंधित विभागांना सल्लागार एजन्सीने तयार केलेल्या राज्यासाठी सर्वसमावेशक साधनसुविधा योजना लागू करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत सल्लागार एजन्सी अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने राज्यासाठी सर्वसमावेशक साधनसुविधा योजना आणि पणजी शहरातील पार्किंगसाठी मास्टर प्लॅनचे तपशीलवार सादरीकरण केले.

मोबिलिटी प्लॅनचे उद्दिष्ट संपूर्ण गोव्यात मार्गांचे योग्य नेटवर्क उभारणे आहे ज्यामुळे राज्यात सुरळीत आणि त्रासमुक्त वाहतूक सुलभ होईल. उत्तम कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी ट्रंक मार्ग आणि फीडर मार्गांवर योजना कार्य करील. मोबिलिटी प्लॅनमध्ये जेट्टी कनेक्टिव्हिटी, एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी, मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट इंटिग्रेशन, मोबिलिटी हब, बस स्टॉपचे नेटवर्क, फ्रेट कॉरिडॉर आणि ट्रकच्या हालचालींसाठी मालवाहतुकीची वेळ आणि फूटपाथ सुधारण्यासाठी योग्य धोरणांचा समावेश असेल.

या बैठकीत इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीसाठी पार्किंग व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना जंक्शन, पार्किंगच्या जागा आणि झोनच्या सुधारणेसाठी मास्टर प्लॅनमध्ये केलेल्या विविध तरतुदींची माहिती देण्यात आली ज्यामुळे पार्किंगचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यात व शहर नियोजन करण्यात मदत होईल.

या बैठकीला इमॅजिन पणजी स्मार्ट सिटीचे एमडी आणि सीईओ श्री. रविधवन, आयएएस; वाहतूक सचिव श्री. सुभाष चंद्रा, आय.ए.एस व इतर अधिकारी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version