गोवा खबर

उदयपूर येथील @गोवा ६० रोड शोला चांगला प्रतिसाद

Published

on

Spread the love

गोवा खबर:राजस्थान सरकारच्या पर्यटन संचालिका श्रीमती. शिखा सक्सेना यांनी  उप संचालक श्री कमलेश शर्मा  यांच्या समवेत माहिती आणि प्रसिध्दी खात्याच्यावतीने गोवा पर्यटन विकास महामंडळाने आयोजित केलेल्या गोवा @ ६० वर रोड शोचे उद्घाटन उदयपूर राजस्थान येथील सेलेब्रेशन मॉलमध्ये केले.

गोवा पर्यटन खात्याचे  उपसंचालक श्री राजेश काळे, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे उपसरव्यवस्थापक श्री दीपक नार्वेकर, माहिती अधिकारी श्री ऑल्विन परेरा,  सहाय्यक संचालक पर्यटन खाते श्री रॉडलिन मास्कारेन्हास आणि सहाय्यक माहिती अधिकारी श्री किरण मुनानकर, यावेळी उपस्थित होते.

रोड शोसाठी उदयपूरची निवड केल्याबद्दल गोवा सरकारचे कौतुक करताना श्रीमती सक्सेना यांनी उदयपूर आणि गोवा यांच्यात समानता असल्याचे सांगितले. ही दोन्ही पर्यटन स्थळे आहेत. अशा व्यासपीठासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे कारण ते सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाणघेवाण आणि जाणून घेण्याची संधी देते आणि  विविध समृद्ध सांस्कृतिक वारसा समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविते असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना श्री शर्मा यांनी गोवा सरकारने आयोजित केलेल्या रोड शोशी निगडित झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना हे अशाप्रकारचे कार्यक्रम लोकांना जवळ आणतात आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मदत करतात असे सांगितले.

मार्केटिंगचे सरव्यवस्थापक श्री दीपक नार्वेकर यांनी गोवा @६० रोड शो विविध शहरांतील लोकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क साधण्यास आणि गोवा सरकारने स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ६० वर्षात केलेल्या प्रगती आणि कार्याची माहिती देण्यास मदत करतो असे सांगितले. या रोड शोच्या माध्यमातून राज्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची लोकांना माहिती देण्याचा आणि गोवा पर्यटनाच्या पैलूंचा आणि नवीन उत्पादनांचा देशाच्या इतर भागात प्रचार करण्याचा आणि गोवा या सुंदर राज्यात येण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्याचा पर्यटन खात्याचा मानस आहे असे सांगितले.

गोव्याला उदयपूरशी आपले नाते अधिक घट्ट करायचे आहे. आपल्या राज्याप्रमाणेच ते एक प्रसिद्ध वेडिंग डेस्टिनेशन आहे. पर्यटकांना आकर्षित करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. उदयपूरच्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने आनंद होत  असल्याचे श्री ऑलविन यांनी रोड शो आयोजित करण्याच्या उद्देशाबद्दल सांगितले.

रोड शोची संकल्पना मेसर्स सीन अॅडव्हेंट्स गोवा यांची आहे. हा शो १८ सप्टेंबर २०२२ पर्यंत आयोजित केला जाईल आणि सर्व सामान्यांसाठी खुला असेल. उद्घाटन सत्रानंतर गोव्यातील कलाकारांनी सादर केलेल्या गोव्यातील लोकनृत्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

गोवा@६० अशी संकल्पना असलेला रोड शो भारतातील सहा शहरांमध्ये आयोजित केला जात आहे. पहिला शो नुकताच अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि तो लवकरच वाराणसी, मदुराई, तिरुवनंतपुरम आणि म्हैसूर या शहरांमध्ये आयोजित करण्याची योजना आहे.

गोव्याच्या ६० व्या वर्षाच्या वर्षभराच्या उत्सवानंतर गोव्याला जगाच्या नकाशावर आणणारा इतिहास आणि समृद्ध वारसा, वैविध्यपूर्ण संस्कृती, पाककृती, विकास आणि गेल्या सहा दशकांमध्ये मिळविलेले यश यांची माहिती देण्यासाठी गोवा सरकारने देशभर उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Trending

Exit mobile version